जन आशिर्वाद यात्रेचे बॅनर फाडल्याप्रकरणी आ. राजन साळवींसह सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेचे बॅनर फाडल्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅनर फाडण्यासह मनाई आदेशाचा भंग करत पाचपेक्षा अधिक जणांनी एकत्र येत घोषणाबाजी केल्या प्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यावर त्याचे पडसाद रत्नागिरीत देखील उमटले. आमदार राजन साळवी यांच्या समवेत शिवसेना पदाधिकार्‍यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागताकरिता लावण्यात आलेले बॅनर फाडून टाकले. तसेच मनाई आदेशाचा भंग करीत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येत घोषणा देऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी आ. राजन साळवी, संजय साळवी, परेश खातू, प्रसाद सावंत, प्रकाश सावंत, प्रशांत साळुंखे यांच्यासह शिवसेनेच्या ८ ते १० पदाधिकाऱ्यांवर रत्नागिरी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस स्थानकात हि फिर्याद महेश कुबडे, पोहेकॉ यांनी दिली आहे.