मालकाविरोधात गुन्हा दाखल
मंडणगड:- तालुक्यातील वाकवली येथे मोकाट गुरांनी धुमाकूळ घालत एका नर्सरीतील ४ लाख रुपयांची रक्तचंदनाची रोपे फस्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ मे रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी कोकण वैभव निसर्ग कंपनीच्या व्यवस्थापकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी जनावरांच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल जार्दन सावंत (वय ५१, रा. शेनाळे, ता. मंडणगड) हे कोकण वैभव निसर्ग कंपनी प्रकल्पाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. मंडणगड तालुक्यातील वाकवली येथे कंपनीची जमीन असून, तिथे एक रोपवाटिका (नर्सरी) आहे. या नर्सरीमध्ये महागडी, रक्तचंदन आणि अगरवुड यांसारख्या मौल्यवान प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली होती.
१२ मे रोजी दुपारी राजू ढेबे (रा. धनगरवाडी, चिभावे, ता. महाड, जि. रायगड) यांच्या मालकीची ६ ते ७ मोकाट गुरे या नर्सरीत घुसली. या गुरांनी नर्सरीतील सुमारे ४,३४८ रक्तचंदनाची रोपे खाऊन टाकली, ज्यामुळे अंदाजे ४ लाख ३४ हजार ८०० रुपयांचे मोठे नुकसान झाले.
या घटनेमुळे नर्सरीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, याबाबत अनिल सावंत यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दिली. मंडणगड पोलिसांनी गुरांचे मालक राजू ढेबे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मंडणगड पोलीस करत आहेत.