रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोरे ओसरल्यामुळे जगबुडी, वाशिष्ठी, अर्जुना, कोदवलीसह काजळी नद्यांची पुरपातळी नियंत्रणात आली आहे. त्यामुळे किनार्यावरील नागरिकांनी निःश्वास सोडला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर बाबनदीजवळ एक भले मोठे काजूचे झाड रस्त्यावर कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू होती.
गुरुवारी (ता. 14) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 60.22 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 95, दापोली 36, खेड 61, गुहागर 17, चिपळूण 76, संगमेश्वर 80, रत्नागिरी 30, लांजा 107, राजापूर 40 मिमी पाऊस झाला. बुधवारी दिवसभर पावसाचा जोर होता. खेडमधील जगबुडी तर चिपळूणातील वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली होती. गुरुवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालेला होता. रत्नागिरी सुर्यदर्शनही झाले. दुपारी अचानक ढग भरुन आले आणि हलका पाऊस पडला. सायंकाळच्या सत्रात किनारी भागात वेगवान वारे वाहत होते. पावसामुळे सकाळच्या सत्रात अणुस्कुरा घाटात दरड कोसळली होती. मात्र काही तासातच दरड बाजूला करण्यात आली. गेले काही दिवस जिल्ह्यातील मोठ्या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर होती. त्यामुळे पुराची शक्यात वर्तविण्यात येत होती. जगबुडी नदी तर गेल्या आठ दिवसात चार वेळा धोक्याच्या पातळीवर होती. प्रशासनाकडूनही सतर्कता बाळगण्यात आली होती. गुरुवारी पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांनी निःश्वास सोडला. मुंबई-गोवा महामार्गावर बाबनदीजवळ एक भले मोठे काजूचे झाड रस्त्याच्या मध्यभागापर्यंत कोसळले. सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू होती. सायंकाळी बांधकाम विभागाकडून झाड काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते. जिल्ह्यात सगळीकडे भातशेतीच्या कामांना वेग आलेला आहे. आतापर्यंत 50 टक्के लावण्यांची कामे पूर्ण झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. पावसामुळे दापोलीत तिन घरांचे तर संगमेश्वरात एका घराचे नुकसान नोंदले गेले आहे.









