जगबुडी पुलावर कंटेनर अधांतरी; २०० फूट खोल नदीत पडता पडता वाचला

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील मृत्यूचा सापळा ठरत असलेल्या जगबुडी पुलावर रविवारी सकाळी एक थरारक अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान मालवाहू कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर पुलाचे दुभाजक तोडून दोन पुलांच्या मधोमध असलेल्या रिकाम्या जागेत अत्यंत भीषणपणे अडकला. या अपघातात कंटेनरचा अर्धा भाग थेट नदीच्या दिशेने झुकला होता.

सुदैवाने, कंटेनर पुलाच्या संरचनेत अडकल्यामुळे सुमारे २०० फूट खोल जगबुडी नदीच्या पात्रात कोसळण्यापासून थोडक्यात बचावला, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. खेड तालुक्यातील भरणे नाका परिसरातील या जुन्या आणि नवीन पुलाच्या दरम्यान कंटेनर अशा पद्धतीने अडकला होता की तो कोणत्याही क्षणी खाली कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन मोठ्या क्रेन पाचारण करण्यात आल्या आणि युद्धपातळीवर बचावकार्य राबवून हा अडकलेला कंटेनर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, चालक किरकोळ जखमी झाला आहे.
या अपघातामुळे महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. कंटेनर बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत सुमारे दीड तास एक मार्गिका बंद ठेवण्यात आली होती, ज्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, याच पुलावर आठवडाभरात घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना असल्याने प्रवाशांमधून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास कंटेनर बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक संथ गतीने पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आले.