बळींची संख्या सहावर
खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड भरणेनजीकच्या जगबुडी नदीच्या पुलावरून मोटार कोसळून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या परमेश पराडकर यांचा उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळी उशिरा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृत्यू झालेल्यांची संख्या आता सहा झाली आहे. या अपघातात पराडकर कुटुंबातील तिघांनाही जीव गमवावा लागला आहे.
परमेश पराडकर हे उत्कृष्ट चालक होते. ओला उबेर या गाड्यांवरही ते मुंबईमध्ये चालक म्हणून काम करत असत. त्यांची पत्नी मेधा पराडकर या पिझ्झा बर्गरसारख्या खाद्यपदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय करत होत्या. त्यांनी नालासोपारा येथे खाद्यपदार्थ विक्रीची गाडीही सुरू केली होती. याशिवाय त्या अनेकांना जेवणाचे डबे देत असत, तर परमेश पराडकर हे वाहनचालक म्हणून काम करून आपलं कुटुंब चालवत होते. पराडकर कुटुंबीय नालासोपारा येथे अनेकांना परिचित होते. या कुटुंबातील परमेश पराडकर, मेधा पराडकर व सौरव पराडकर या तिघांचा या दुर्दैवी भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या पराडकर यांचा मुलगा सौरव परमेश पराडकर (वय २३) याला दोन वर्षांपूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी लागली होती. हे कुटुंब आनंदाने संसार करत होतं; मात्र गावी निघालेल्या या कुटुंबावर काळाचा आघात झाला आहे. अलीकडेच पराडकर यांनी नालासोपारा येथे नवीन फ्लॅटही घेतला होता. त्यांच्या मृत्यूने मित्रपरिवार तसेच नालासोपारा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पराडकर कुटुंबातील या तिघांवरही आज नालासोपारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. परमेश पराडकर यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.