पाटबंधारे विभाग; 12 ठिकाणी पावणेतेला लाख घनमीटर गाळ
रत्नागिरी:-जगबुडीसह उपनद्यांमधील गाळ काढल्यास नदी प्रवाह विना अडथळा सुरळित होईल आणि खेड शहराचे पुरापासून संरक्षण होऊ शकतो. त्यासाठी नदी, उपनद्यांसह खाडी पट्ट्यातील दहा ठिकाणचा सुमारे पावणे तेरा लाख घनमीटर गाळ काढणे आवश्यक आहे. त्यासाठी 10 कोटी 80 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी जिल्हा नियोजनमधून मिळावा असा प्रस्ताव मे महिन्याच्या अखेरीस पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
जगबुडी व डुबी नदीला गतवर्षी जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर नदीजवळच्या बाधीत ग्रामपंचायतींनी खेड शहरवासीयांनी नदीपात्रातील गाळ काढण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर वाशिष्ठी नदीप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि खेड उपविभागिय अधिकारी यांनी गाळ काढण्यासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना पाटबंधारे विभागाला केल्या. जगबुडी, तिच्या उपनद्या डुबी, कुंभार्ली व चोरद नदी पात्रांची पाहणी करुन पाटबंधारेकडून गाळ काढण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यानुसार दहा ठिकाणांवरील 12 लाख 89 हजार 900 घनमीटर गाळ काढणे आवश्यक आहे. नदीत साधारणपणे माती मिश्रीत दगड-गोटे व काही ठिकाणी वाळू मिश्रीत रोडा पात्रात भरलेला आहे. गाळ काढण्यासाठी अथवा जाहीर लिलावाद्वारे गाळ काढण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने करावी असे अहवालात नमुद केले आहे. नदीपात्रातील गाळ हा अलोरे यांत्रिकी विभागाच्या सहकार्याने जिल्हा नियोजनच्या निधीतून काढला जावा अशी मागणी केली आहे. वाशिष्ठीच्या धर्तीवर जगबुडी व नारंगी नदीतील गाळ यांत्रिकी विभागाकडून काढल्यास 83.78 रुपये प्रति घनमीटरप्रमाणे 10 कोटी 80 लाख 67 हजार 822 रुपये खर्च येईल असे पाटबंधारे विभागाच्या अहवालात नमुद केले आहे.
जगबुडी नदी, उपनद्या आणि खाडी परिसरातील 12 ठिकाणांवरील 12 लाख 89 हजार 900 घनमीटर गाळ काढणे आवश्यक आहे. त्यातील जगबुडी नदीपात्रातील कुडोशी ते भरणे बंधारा 2 लाख 17 हजार 500, भरणे ते नारंगी नदी संगमापर्यंत 2 लाख 50 हजार, डुबी नदीपात्र खोपी ते मिर्ले 3 लाख 50 हजार, कुंभार्ली नदी 30 हजार, चोरद नदी संगम ते सुकिवली ब्रिज 15 हजार घन. मी. गाळ आहे. जगबुडी नदीच्या खाडी भागातील कोंडीवली बेटावर 38 हजार 400 घन. मी., निळिक बेटावर 1 लाख 60 हजार, भोस्ते बेट 52 हजार 200 घ. मी., भोस्ते खारी भाग 1 लाख 54 हजार घ. मी. क्षेत्रावरील गाळ काढणे आवश्यक आहे. हा गाळ खाडी भागातील असल्यामुळे मेरी टाईम बोर्डामार्फत कार्यवाही करता येऊ शकते.









