छत्रपती संभाजी स्मारकाला निधी नव्हे, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा कसबा येथे हल्लाबोल

संगमेश्वर:- तालुक्यातील कसबा येथे प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत निधीची नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीची कमतरता असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. कसबा येथे भव्य व दिव्य स्मारक उभारावे, अशी मागणी स्थानिक स्तरावर सातत्याने होत असतानाही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, संभाजी महाराजांचे कार्य व विचार त्यांचे जाज्वल्य इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पालकमंत्री तसेच इतर नेते स्मारकाबाबत घोषणा करतात; मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नसल्याने जनतेत नाराजी आहे. दिलेला शब्द पाळून स्मारकाचे काम तातडीने सुरु करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या स्थळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी सकाळी काँग्रेस कार्यकर्तांसमवेत भेट दिली आणि परिसराची पाहणी केली.

यावेळी पुढे ते म्हणाले अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाची घोषणा झाली, मात्र ते अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. त्याचप्रमाणे कसबा येथील संभाजी महाराज स्मारकाचीही अवस्था होऊ नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
तत्कालीन अर्थमंत्री यांसह अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिली असून, मुख्यमंत्र्यांनी देखील याचा आढावा घेतला. त्यामुळे इतर भागांप्रमाणे येथेही विकास व्हावा, अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली. या स्मारकासाठी निधीची अडचण नसून राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जाणवत असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्शवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले. यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, उत्तर विभागाच्या जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग, संगमेश्वर तालुका अध्यक्ष काशिनाथ वाजे, माजी तालुका अध्यक्ष फैज पाटणकर, मुरलीधर बोरसुतकर, चंद्रकांत कदम, दिलिप मोहिते आदी अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रथमत: सपकाळ यांनी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.