चोवीस तासात 33 रुग्ण कोरोनामुक्त; नवे रुग्ण अवघे नऊ 

रत्नागिरी:-  मागील चोवीस तासात जिल्ह्यात अवघे नऊ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 33 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवाळी सणापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने रत्नागिरीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

मागील काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. नव्याने नऊ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 476 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 71 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 49 हजार 60 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

सोमवारी तब्बल 33 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 7 हजार 947 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट वाढून 93.75 टक्क्यांवर पोचला आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 317 बळी घेतले आहेत.