रत्नागिरी:- कोरोना संसर्ग जिल्ह्यात बर्याच प्रमाणात कमी होताना दिसत आहे. हळूहळू जिल्हा कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडत आहे. गेल्या 24 तासांत केवळ 18 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. एकूण बाधितांची संख्या 8 हजार 196 झाली आहे. जिल्ह्यात आज तब्बल 798 कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. काल तीन महिन्यातील सर्वांत कमी कोरोनाग्रस्त सापडले होते. तर आज फक्त 18 कोरोना पाॅझिटीव्ह आढळले आहेत. आज जिल्ह्यात एकही कोरोनाबळी नाही. जिल्ह्यातील कमी झालेला मृत्यूदर ही दिलासादायक बाब आहे.
आज सापडलेल्या 18 रुग्णांमध्ये आरटीपीसीआरमध्ये 8 तर अँटिजेन चाचणीत 10 रुग्ण सापडले. यामध्ये दापोली 1, चिपळूण 9 आणि मंडणगडमधील 8 रुग्णांचा समावेश आहे तर रत्नागिरी, खेड, गुहागर, संगमेश्वर, राजापूर या पाच तालुक्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही.
जिल्ह्यात आज 43 जण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 7 हजार 427 कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 90.61 टक्क्यांवर गेले आहे. जिल्ह्यात आज 798 अहवाल निगेटिव्ह आढळले असून आतापर्यंत एकूण 45 हजार 446 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.