रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरु असून संवर्ग १ मधील १२२७ पैकी १४ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे पडतळणीमध्ये आढळून आले आहे. त्या शिक्षकांचे प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. बदली झालेल्या शिक्षकांची यादी येत्या पंधरा दिवसात सरल पोर्टलवर जाहीर केली जाणार आहे. याला शिक्षण विभागाकडून दुजोरा मिळाला आहे.
कोरोनामुळे रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यंदा पुर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून कंबर कसली आहे. गेले तीन महिने सातत्याने पाठपुरावा करत ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्यातील सर्व शिक्षकांची माहिती पोर्टलवर भरुन झाली आहे. प्रत्यक्ष बदलीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात संवर्ग १ म्हणजेच विधवा, परितक्त्या, गंभीर आजारी, दिव्यांग, कुमारिका, घटस्फोटित, माजी सैनिक असलेले आणि संवर्ग २ म्हणजेच पतीपत्नी एकत्रीकरणांतर्गत बदलीसाठी इच्छुक शिक्षकांना आपली माहिती पोर्टलवर भरावयाची होती. संवर्ग १ साठी पात्र असलेल्या १ हजार २२७ जणांनी तर संवर्ग २ मधून १०६ शिक्षकांनी माहिती भरली आहे. त्याला जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी त्रिसदस्यीय समितीद्वारे करण्यात आली. यामध्ये १४ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्या शिक्षकांचे प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये काहींनी अपंगत्वाचे जुने तर काहींनी ऑनलाईन सर्टिफिकेट जोडलेले नाही असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे १ हजार २१३ शिक्षक बदलीसाठी पात्र ठरलेले आहेत. संवर्ग २ मधील १०६ शिक्षकांचे प्रस्ताव पात्र ठरले आहेत. या शिक्षकांनी बदली हवी असलेल्या शाळांची यादी ऑनलाईन भरलेली आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात बदल्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.