चिपळूण मिरजोळी येथील सरपंच अविश्वासाच्या ठरावावर आज सुनावणी

चिपळूण:- महिनाभरापूर्वी मिरजोळीचे सरपंच कासम दलवाई यांच्यावर सदस्यांनी अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला आहे. मात्र या विरोधात दलवाई यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांच्याकडे अपिल दाखल केले असून त्यावर २३ मार्च रोजी दुपारी १ वा. सुनावणी होणार आहे. त्यामुळे याच्या निकालाकडे गावासह तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दोन वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत दलवाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व मिळवले होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीनंतर काही महिन्यांतच सरपंच दलवाई व सदस्यांमध्ये कुरबुरी सुरू झाली. यातूनच वर्ष पूर्ण होताच २८ फेब्रुवारी २०२२ रोजी सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव तहसीलदारांकडे दाखल केला. मात्र निर्धारित कालावधीत हा प्रस्ताव दाखल करता येत नसल्याने तो त्यावेळी फेटाळण्यात आला. २ वर्षे पूर्ण होताच सदस्यांनी महिनाभरापूर्वी पुन्हा अविश्वासाचा ठराव तहसीलदारांकडे दाखल केला. त्यानुसार झालेल्या विशेष सभेत उपस्थित ८ सदस्यांपैकी ७जणांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने हा ठराव संमत करण्यात आला. तसे प्रभारी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी जाहीर केले. मात्र अविशवास ठरावात ठेवण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, असे म्हणत दलवाई यांनी हे अपिल दाखल केले. त्यानुसार ही सुनावणी होत असून याला दलवाई यांच्यासह अविश्वासाचा ठराव आणलेले सदस्य व प्रभारी तहसीलदार शेजाळ उपस्थित राहून आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे या अपिलाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.