चिपळूण पॉवर हाऊस येथे ट्रकखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

चिपळूण:- चिपळुणात खड्ड्यांच्या प्रश्नावर आवाज उठवूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत आहे. चिपळूण शहरातील पॉवर हाऊस येथे दुचाकीस्वाराचा ट्रकखाली सापडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. किरण कृष्णा घाणेकर असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडला.

 रोलरने खड्डे बुजवित असतांना ठेकेदार कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही काळजी न घेतल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे .चिपळूण शहरात खड्डे बुजविण्याच्या कामास सुरवात झाली. शनिवारी पाग पॉवर मार्गावर खड्डे बुजवविण्याचे काम सुरू होते.दरम्यान लोटे दिशेकडून कोंडमळ्याकडे जाणारा दुचाकीस्वार पाग पॉवर हाऊस येथे आला असता समोरून येणाऱ्या ट्रकखाली तो सापडला. या घटनेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या तरुणाने हेल्मेट घातलेले असतानाही त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.या घटनेची माहिती मिळताच नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.या तरूणाचा मृतदेह कामथे उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. किरण हा लोटे येथील कंपनीत नोकरीस होता.