चिपळूण:- येथील पंचायत समिती सभापती पदी रिया कांबळे यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली आहे. चिपळूण पंचायत समितीच्या इतिहासात बौद्ध समाजाला सभापती पदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीबद्दल रिया कांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुमारे दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, सेना अशी महाविकास आघाडी झाली. यानंतर हा पॅटर्न राज्यात अन्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी राबवू लागले. यानुसार गेल्या सव्वा वर्षापूर्वी येथील पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत राबविण्यात आला. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व सेनेच्या येथील नेत्यांच्या बैठकीत सव्वा वर्षे सेनेचा नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याला संधी देण्याचा निर्णय झाला होता. यानुसार यापदासाठी सव्वा वर्षापूर्वी सभापतीपदी सेनेच्या धनश्री शिंदे तर उपसभापती पदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य पांडुरंग माळी यांची वर्णी लावण्यात आली. हा सव्वा वर्षाचा कालावधी संपल्यानंतर धनश्री शिंदे यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, या पदासाठी सदस्या रिया कांबळे यांच्यासह समीक्षा घडशी यांचे नाव पुढे आले होते. दोघांची नावे समोर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सभापती पदासाठी सौ. रिया कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान, गुरुवारी सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीण पवार यांनी काम पाहिले. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिया कांबळे यांनी सभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज नेत्यांच्या उपस्थितीत सादर केला. सौ. कांबळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने रिया कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभापती पदी रिया कांबळे यांची निवड झाल्याचे घोषित केले. एकंदरीत सभापती पदी रिया कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे समोर आले.
या निवडीनंतर आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष जयंत खताते, माजी सभापती श्री. मुकादम, सौ. पूजा निकम, पांडुरंग माळी, सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.









