चिपळूण पंचायत समितीत त्रिशंकू कौल

शिवसेना-भाजप युतीचे ७, राष्ट्रवादीचे ७ तर ठाकरे सेनेचे ४ उमेदवार विजयी

चिपळूण:- तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला ७, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाला ७ तर ठाकरे सेनेचे ४ उमेदवार निवडून आल्यामुळे त्रिशंकू चित्र निर्माण झाल्याने चिपळूण पंचायत समितीवर कोणाची सत्ता स्थापन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे भाजपने जिल्हा परिषदेच्या दोन तर चिपळूण पंचायत समितीच्या ३ जागा जिंकत चिपळूणच्या राजकारणात दमदार ‘एन्ट्री’ केली आहे. ही निवडणूक भाजपकडून नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आ. शेखर निकम यांनी एकाकी लढत देत जि.प.च्या ३ तर पं.स.च्या ७ जागा निवडून आणल्या आहेत. शिवसेना शिंदे गट पक्षाच्या जि.प.च्या ३ जागा तर पं.स.च्या ४ जागा निवडून आल्या आहेत. शिवसेना शिंदे गट पक्षाकडून शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी निवडणुकीची कमान सांभाळली होती. एकंदरीत तीनही नेत्यांनी चिपळूणच्या राजकारणात आपली ताकद दाखवून दिली आहे.

चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीप्रमाणे शिवसेना-भाजप युतीने एकत्रित निवडणुका लढवत शिवसेनेने ६ जि.प. गटात तर ११ पं.स. गणात तसेच भाजपने ३ जि.प. गटात व ७ पं.स. गणात निवडणूक लढवली. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली. शिवसेना उबाठादेखील स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरला होता. शिवसेना-भाजप युतीकडून माजी आ. सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून आ. शेखर निकम, शिवसेना उबाठाकडून आ. भास्कर जाधव यांनी निवडणुकीची धुरा सांभाळली.

जि.प.च्या ९ जागांमध्ये शिवसेना शिंदे गटाने ३ जागा जिंकल्या. यामध्ये कळवंडे गटातून मयुरी शिर्के, वहाळ गटातून शिवानी सावंत, अलोरे गटातून विनया झगडे, भाजपकडून पेढे गटातून दिप्ती महाडिक, खेर्डी गटातून रावी मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून शिरगाव गटातून नेहा रहाटे, सावर्डे गटातून पूजा निकम, कोकरे गटातून संजय कदम तर शिवसेना उबाठा पक्षाकडून उमरोली गटातून प्रमोद निवळकर विजयी झाले आहेत.

पंचायत समितीच्या १८ जागांमध्ये भाजपने ३, शिवसेना शिंदे गट पक्षाने ४, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाने ७ तर शिवसेना उबाठा पक्षाने ४ जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजपकडून कळवंडे गणातून सायली वाजे, खेर्डी गणातून विनोद भुरण, पिंपळी खुर्द गणातून सुप्रिया देवरूखकर, शिवसेना शिंदे गट पक्षाकडून भोम गणातून पूजा जवरत, पेढे गणातून संदेश आयरे, अलोरे गणातून विनोद झगडे, वहाळ गणातून संजय जावळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून दळवटणे गणातून विद्या इंगवले, वेहेळे गणातून सुर्यकांत खेतले, शिरगाव गणातून स्नेहा साळवी, सावर्डे गणातून शौकत माखजनकर, मांडकी गणातून शरद शिगवण, कोकरे गणातून उज्वला घाग तर शिवसेना उबाठाकडून कापसाळ गणातून सुभाष जाधव, उमरोली गणातून गौरव पाटेकर, निवळी गणातून संजीवनी खापरे असे उमेदवार विजयी झाले आहेत.

खेर्डी जि.प. गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून माजी जि.प. सदस्या दिशा दाभोळकर व शिवसेना-भाजप युतीच्या रावी मोरे यांच्यात लढत झाली. या लढतीत रावी मोरे यांनी दिशा दाभोळकर यांचा पराभव करून जि.प.साठी एन्ट्री मिळवली आहे. या गटात चुरशीची लढत होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, भाजपच्या रावी मोरे यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. तसेच खेर्डी गणात पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन ठसाळे व शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार तथा भाजपचे ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण यांच्यात लढत झाली. यामध्ये भुरण यांनी ठसाळे यांचा तब्बल ५६९ मतानी पराभव केला. तसेच वहाळ गणात माजी सभापती सुरेश खापले यांचा पराभव झाला आहे. युतीचे उमेदवार संजय जावळे यांनी खापले यांना पराभवाची धुळ चारली आहे. सावर्डे जि.प. गटात माजी पं.स.च्या दोन माजी सभापतींमध्ये लढत झाली. यामध्ये शिवसेना-भाजप युतीकडून धनश्री शिंदे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून पूजा निकम यांच्यात झालेल्या लढतीत पूजा निकम यांनी धनश्री शिंदे यांचा तब्बल ५ हजार ६१९ मतांनी पराभव केला आहे. तसेच कोकरे गटात माजी पं.स. सदस्य तथा माजी सभापती संतोष चव्हाण कोकरे गटातून निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे संजय कदम यांनी संतोष चव्हाण यांचा २१४५ मतांनी पराभव केला आहे. एकंदरीत या निवडणुकीत माजी पं.स. सदस्य, जि.प. सदस्य यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
अलोरे जि.प. व पं.स. गणात पती-पत्नी विजयी
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा बांधकाम समिती सभापती विनोद झगडे यांनी अलोरे गणातून तर त्यांच्या पत्नी विनया झगडे विजयी झाल्या आहेत. श्री. झगडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे निलेश कदम यांचा तर सौ. झगडे यांनी माजी पं.स. सदस्य रमेश राणे यांच्या सुकन्या गायत्री कदम यांचा पराभव केला आहे. या दोघींमध्ये चुरशीची लढत झाली.

भाजपची दमदार एन्ट्री तर आ. शेखर निकम यांची एकाकी लढत
चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने एकत्रित निवडणुका लढवित न.प.वर युतीचा भगवा फडकवला. यामध्ये भाजपने ७ तर शिवसेनेने ९ जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकाकी लढत द्यावी लागली. यातून अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. चिपळूण न.प. निवडणुकीप्रमाणे शिवसेना-भाजप युती झाली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्ष स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेला. आ. शेखर निकम यांना न.प. निवडणुकीत अपयश आले असले तरी जि.प. व पं.स. निवडणुकीत चांगलेच यश मिळाले आहे. चिपळूण तालुक्यातील जि.प.च्या ३ जागा तर पं.स.च्या ७ जागा निवडून आणून ग्रामीण भागातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपकडून प्रशांत यादव यांनी निवडणुकीची धुरा सांभाळली होती. चिपळूण न.प.च्या निवडणुकीप्रमाणे ग्रामीण भागात देखील यश संपादन केले आहे. जि.प.च्या ३जागा लढवल्या होत्या. यामध्ये २ जागा तर पं.स.च्या ७ जागा लढवल्या होत्या. यामध्ये ३ जागा निवडून आणून ग्रामीण भागातदेखील भाजपने पाय रोवले असल्याचे सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिवसेनेकडून नेतृत्व करताना जि.प.च्या ३ तर पं.स.च्या ४ जागा निवडून आणण्यात यश मिळवले आहे. एकंदरीत या तीनही नेत्यांनी ग्रामीण भागाती आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे.

पेढे जि.प. गटात शिवसेना उबाठाच्या मानसी भोसले व भाजपा-शिवसेना युतीच्या दिप्ती महाडिक यांच्यात चुरशीची लढत झाली. अखेर दिप्ती महाडिक यांनी मानसी भोसले यांचा ८५७ मतांनी पराभव केला. वहाळ गटात युती व शिवसेना उबाठा यांच्यात चुरशीची लढत झाली. शिवसेना-भाजपा युतीच्या शिवानी सावंत यांनी ४१७९ मते मिळवली. तर उबाठाच्या पूर्वा जाधव यांना ३७९० मते मिळाली. शिवानी सावंत या अवघ्या ३८९ मतांनी विजयी झाल्या आहेत. या लढती पाहता चिपळूण पं.स. व जि.प. निवडणुकीसाठी चुरशीच्या लढती झालेल्या पहावयास मिळाल्या आहेत.