चिपळूण पंचायत समितीच्या सत्तेसाठी पालकमंत्र्यांचे ‘महायुती’चे संकेत

आमदार शेखर निकम यांचा ‘स्वाभिमानी’ बाणा चर्चेत

चिपळूण:- चिपळूण पंचायत समितीच्या सत्तेची गणिते जुळविण्यासाठी महायुतीतील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी तालुक्यात महायुती पुन्हा दिसेल, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र निवडणुकीवेळी दुखावले गेलेल्या आमदार शेखर निकम यांनी स्वाभिमानी बाणा दाखवल्याने याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मांडकी-पालवण येथील कार्यक्रमावेळी सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुती पुन्हा दिसेल असे वक्तव्य करत सत्ता स्थापनेसाठी डाव टाकला आहे. पण सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी (अजित पवार गट) महायुतीचे दरवाजे कायमचे बंद असल्याची घोषणा नगरपालिका निवडणुकीवेळी घोषणा केली. यामुळे आमदार शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुखावले होते.

सामंत यांनी, नगरपरिषद निवडणूकीत भाजप शिंदेसेनेला यश आल्यानंतर तोच फॉर्म्युला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत राबवण्यात आला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेससाठी महायुतीचे दरवाजे कायमचे बंद, असे म्हणत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला चार हात लांब ठेवण्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती.

मात्र आता लागलेल्या निकालानंतर भाजप शिंदेसेना युतीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत एकहाती सत्ता मिळवता आली नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाला सर्वाधिक सात, ठाकरे शिवसेनेला ४ तर शिवसेना भाजप युतीला ७ जागा मिळाल्या. या यशानंतर चिपळूण पंचायत समितीत सत्तेची गणिते बांधताना जो सभापतीपदासाठी पाठींबा देइल त्यांच्यासोबत सत्ता स्थापनेचा दावा आमदार निकम यांनी केला होता. राष्ट्रवादीची मुख्य लढत ही युतीच्या उमेदवारांसोबत झाली होती. त्यामुळे युतीला सोडून ठाकरेसेने सोबत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरवातीला सुरू होत्या.

मात्र ठाकरेसेना सत्तेत सहभागी होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली सुरू आहेत. निवडणूकीपुर्वी राष्ट्रवादीला महायुतीचे दरवाजे कायमचे बंद असल्याची घोषणा पालकमंत्र्याकडून झाली. मात्र आता राष्ट्रवादीला सोबत घेण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे युतीच्या निदर्शनास आले आहे. यानंतरच आता राष्ट्रवादी सोबत महायुती होण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिलेत. सामंत यांच्या संकेतानुसार आमदार शेखर निकम यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत सामावून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

या वाटावाघीत सभापतीपदावर राष्ट्रवादीचा दावा कायम असून तो त्यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सत्तेसाठी महायुती करणारे नेते पुढील विधानसभा निवडणूकीत आमदार निकमांसमोर आव्हान निर्माण करण्याची शक्यता असल्याने चिपळूणात महायुतीसाठी सावधगिरीने पावले टाकली जात आहेत. तर पालकमंत्र्याच्या डावपेचामुळे सत्ता स्थापनेच्या हालचाली नव्या वळणावर येऊन ठेपल्या आहेत.

दरम्यान भाजपने आतापासून विधानसभेची गणिते जुळवण्यास सुरवात केली असून भाजपनेते प्रशांत यादव हे विधानसभेची मोट बांधू लागले आहेत. तसेच शिंदेसेनेकडून उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण देखील विधानसभेसाठीची गणिते जुळवू लागले आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षातील एकाही नेत्याने सत्ता स्थापनेबाबत जाहीरपणे बोलणे टाळले आहे. तर एकमेका विरोधात लढणारे पुन्हा सत्तेसाठी एकत्र येतात की नाही, याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.