चिपळूणमध्ये विवाहितेचा छळ; पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण:- दोन दिवसापूर्वीच चिपळुणात पतीच्या, सासऱ्याच्या जाचाला कंटाळून सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता तालुक्यातून दुसरी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका विवाहितेचा पतीसह कुटुंबातील सदस्यांकडून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पती, एक महिला आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजिद सिराज पाटकरी (पती), एक अज्ञात महिला आणि सासरे सिराज पाटकरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जून २०१२ पासून ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही घटना घडली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी साजिद सिराज पाटकरी (पती), एक अज्ञात महिला आणि सासरे सिराज पाटकरी यांनी संगनमत करून तिला वेळोवेळी मारहाण केली, शिवीगाळ केली. तसेच, पीडित महिला आणि तिच्या मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी देखील त्यांनी घेतली नाही.

याशिवाय, मागील तीन वर्षांपासून पतीने तिच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवले नाहीत, ज्यामुळे तिला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक जाच सहन करावा लागला, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर प्रकरणी २७ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.