चिपळूण:- चिपळूण शहरातील औदुंबर बाग आणि रिगल कॉलेजजवळ झालेल्या एका भीषण अपघातात ६० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.५५ वाजता घडली. चिपळूण युनायटेड हायस्कूलजवळ राहणारे चंद्रमणी पांडुरंग जाधव (वय ६०) हे त्यांच्या पुतण्या विशाल जाधव बरोबर ज्युपिटर मोटारसायकलने (क्र. एमएच ०८ एटी १९०६) रामपूरहून चिपळूणकडे येत होते. चंद्रमणी जाधव हे गाडी चालवत होते आणि त्यांचा पुतण्या विशाल मागे बसला होता.
औदुंबर बाग आणि रिगल कॉलेजच्या मधील रस्त्यावरून जात असताना, अचानक गाडीचा वेग जास्त असल्याने आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी स्लिप झाली. या अपघातात चंद्रमणी जाधव आणि त्यांचे पुतणे दोघेही खाली पडले. दुचाकी चालवत असलेले चंद्रमणी जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले.
त्यांना तातडीने डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूमुळे जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची तक्रार विशाल जाधव यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी भा.दं.वि. कलम १०६(१), १२५(अ)(ब) २८१ आणि मो.वा.का. १८४ नुसार गु.र.क्र. १९८/२०२५ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.