चिपळूणमध्ये तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला आग; तिघांना वाचवण्यात यश

चिपळूण:-शहरातील कावीळतळी भागातील ऑर्चीड बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीने अक्षरशः रौद्र रुप धारण केले होते. भीषण आगीचा सामना करत अग्निशमन दलाच्या जवानांनी सदनिकेमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. यामुळे सुदैवाने  कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कावीळतळी भागातील ऑर्चीड बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावर सय्यद यांच्या सदनिकेत अनंत सानप कुटुंबीय भाड्याने राहत होते. काल, मंगळवारी रात्री अचानक एसीजवळ असलेल्या स्वीच जवळ शॉर्टसर्किट झाले. त्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे संबंधित कुटुंब आगीत अडकून पडले होते. त्यांनी आरडाओरडा करताच शेजाऱ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. मात्र घराचा मुख्य दरवाजा बंद होता.

अखेर मुख्य दरवाजा तोडण्यात आला. त्याचवेळी माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानानी घटनास्थळी दाखल होत तत्काळ आग नियंत्रणात आणली. त्यानंतर आतमध्ये अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले.