चिपळूण:- तालुक्यातील खांदाट, मोरवणे फाटा येथील एका २७ वर्षीय तरुणीने घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २५ जून रोजी सकाळी ११.३० ते १२.०० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती शकुंतला अशोक चव्हाण (वय २७, रा. खांदाट, मोरवणे फाटा, ता. चिपळूण) यांनी राहत्या घरी बेडरूममध्ये पंख्याला साडीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. घटनेच्या वेळी घरात कोणीही नव्हते.
शकुंतला चव्हाण यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांना तातडीने लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा ईसीजी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात २५ जून रोजी सायंकाळी ४.२२ वाजता आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत.