चिपळूणमध्ये आढळले आफ्रिकेतील ‘ब्लॅक हेराॅन’ पक्षी; भारतातील पहिली नोंद

चिपळूण:- भारत आणि महाराष्ट्रात पक्षी नोंदीच्या दृष्टीने ‘ब्लॅक हेरॉन’ या पक्ष्याची महत्त्वपूर्ण नोंद झाली आहे. भारतामधील या पक्ष्याची ही पहिलीच नोंद ठरली आहे. चिपळूण तालुक्यातील एका पाणथळ जागेत या पक्ष्याची नोंद स्थानिक पक्षीनिरीक्षक डॉ. श्रीधर जोशी यांनी केली आहे.

चिपळूमधील श्रीधर जोशी हे पेशाने डॉक्टर आहेत. सध्या ते चिपळूणमध्ये वास्तव्यास आहेत. गेल्या दोन दशकांपासून ते पक्षीनिरीक्षण करत आहेत. रविवार दि. ३ ऑगस्ट रोजी ते चिपूळणमधील एका पाणथळीवर पक्षीनिरीक्षणासाठी गेले होते. त्यावेळी सकाळी अंदाजे ८:३० वाजता एका उथळ पाण्याच्या जलाशयात त्यांना दोन पक्षी दिसले. त्यांनी लागलीच या पक्ष्यांची छायाचित्र टिपली आणि ती तपसाल्यावर त्यांना हे दोन्ही पक्षी ‘ब्लॅक हेराॅन’ पक्षी असल्याचे लक्षात आले. डॉ. जोशींनी टिपलेली छायाचित्रे आणि त्यांच्या निरीक्षणांनंतर त्यांची अनेक पक्षी अभ्यासकांशी चर्चा झाली. काहींनी सुरुवातीला हा ‘ब्लॅक क्राऊन्ड नाईट हेरॉन’ (रातबगळा) असावा, असा अंदाज व्यक्त केला. मात्र लांबट पाय, संपूर्ण काळे शरीर आणि मासेमारी पद्धतीच्या खास शैलीमुळे हा पक्षी म्हणजे ‘ब्लॅक हेरॉन’च असण्यावर शिक्कामोर्तब झाले.

या पक्ष्याची भारतामधील ही पहिलीच नोंद ठरली आहे. ‘ब्लॅक हेराॅन’ म्हणजेच काळा बगळा हा पक्षी हा मुख्यत्वे उप-सहारा आफ्रिका आणि मादागास्करमध्ये आढळणारा पक्षी आहे. त्यामुळे भारतात याचे दर्शन होणे अत्यंत दुर्मीळ आहे. हा काळसर, मध्यम आकाराचा बगळा सेनेगल, सुडान, केनिया, तंजानिया, दक्षिण आफ्रिका आणि मादागास्कर यांसारख्या आफ्रिकन देशांमध्ये आढळतो. तो स्थलांतर न करता एकाच परिसरात राहतो. अन्न-पाण्याची टंचाई असेल, तरच तो नवीन ठिकाणी स्थलांतर करतो. युरोपातील या पक्ष्याच्या काही अपवादात्मक नोंदी (ग्रीस, इटली, आयर्लंड) असून भारतात यापूर्वी त्याचे अस्तित्व नोंदले गेले नव्हते.

‘कॅनोपी फिडींग’ची पद्धती

‘कॅनोपी फिडिंग’ ही ‘ब्लॅक हेराॅन’ची मासे पकडण्याची अनोखी युक्ती आहे. यासाठी हा पक्षी आपले पंख अर्धगोलाकार पसरवतो. त्या सावलीत मासे खेचले जातात आणि त्यांना पकडणे सोपे होते. ही पद्धत अत्यंत थोड्या पक्ष्यांमध्ये विशेषतः ‘ब्लॅक हेरॉन’मध्येच आढळते.

पक्ष्याविषयी गूढ
आफ्रिकेतून हे पक्षी चिपळूणमध्ये कसे आले, हे अद्याप न उलगडलेले रहस्य आहे. गेल्या आठवड्याभर आम्ही या पक्ष्याची जोडी पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी अनेक पाणथळ जागा आम्ही पालथ्या घालत आहोत. – डॉ. श्रीधर जोशी, पक्षी निरीक्षक, चिपळूण