मे अखेरपर्यंत होणार काम पूर्ण, पाईप मोरीच्या कामावर स्थानिक ग्रामस्थांचा आक्षेप
चिपळूण:- दरवर्षी पावसाळ्यात शहराला महापूर व अतिवृष्टीत दुथडी भरून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या प्रवाहाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गाळ उपश्यासह नलावडे बंधारा उभारला जात आहे. शंकरवाडी-मुरादपूर भागात भलीमोठी संरक्षक भिंत उभारली जात आहे. मे अखेर पर्यंत बंधाऱ्याचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे येत्या पावसात हा बंधारा चिपळूणकरांच्या दृष्टीने तारणहार ठरणार आहे.
वाशिष्ठी व शिवनदीच्या काठावर चिपळूण शहर वसले आहे. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टी वेळी दरवर्षी येथे महापूर किंवा पुरसदृश्य स्थिती निर्माण होते. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. सलग दोन वर्षे गाळ उपसा केला जात आहे. त्याशिवाय शहरात पूररेषेच्या आत बांधकामांवर नियंत्रित आणले आहे. त्यानंतर आता पुराची तीव्रता कमी करण्यासाठी नलावडे बंधारा उभारला जात आहे. हा बंधारा चिपळूणचा महापुरवर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून तितकाच फायदेशीर ठरणार आहे.
शहरामध्ये शंकरवाडी-मुरादपूर या दोन वाड्यांमध्ये कमी उंचीचा सखल भाग आहे. या नदीच्या वळणावर संरक्षक भिंतीचे (नलावडा बंधारा) जुने दगडी बांधकाम पूर्णम केलेले होते. परंतु 2005 च्या पुरामुळे बंधाऱ्याचे बांधकाम वाहून गेले. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून वित्तहानी होत आहे. 2021 च्या महापुरातही मोठा फटका या भागासह शहराला बसला. यामुळे या ठिकाणी पूर संरक्षक भिंत उभारली जावी, अशी मागणी चिपळूण बचाव समितीसह स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने होत होती. त्या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी पावसाळ्यापूर्वी येथील संरक्षक भिंत उभारणीसाठी 20 कोटी 21 लाख 19 हजार 300 रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.
चिपळुणातील प्रीमियर सिव्हील काँट्रॅक्ट या कंपनीमार्फत हे काम सुरु आहे. 23 डिसेंबर 2024 रोजी आमदार निकम यांच्या हस्ते नलावडा बंधारा पूर संरक्षक भिंत कामाचे भूमिपूजन पार पडले होते. गेल्या तीन महिन्यापासून ही भिंत उभारणीचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. वाशिष्ठी किनारी 285 मीटर लांबी व 12 मीटर उंचीची ही भिंत आहे. पावसाळ्यापूव हा प्रकल्प माग लावावा, अशा सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत. त्यानुसार ठेकेदार कंपनीने कामाची गती वाढवली आहे. सध्यस्थितीत 20 कामगार, 3 पोकलेन, 4 डम्पर, ब्रेकर, 5 टीएम अशी यंत्रसामुग्री कार्यरत आहे. तर कंपनीचा स्वतःचा प्लांट असून या सर्व कामावर प्रोजेक्ट मॅनेजर दीपक जाधव लक्ष ठेऊन आहेत. या कामाची जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता नाईक, सुर्वे व कार्यकारी अभियंता सलगर यांच्या मार्फत सातत्याने देखरेखही सुरू आहे.