चिपळुणात सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरेना

शिमगोत्सवानंतर राजकीय हालचालींना येणार वेग

चिपळूण:- चिपळूण पंचायत समिती निवडणूकीत शिंदेसेना भाजप युतीला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाशी हातमिळवणी करावी लागणार आहे. सत्ता स्थापनेसाठी ठाकरेसेनेला बाजूला ठेवून महायुती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सभापतीपदासाठी फॉर्म्युला निश्चीत केला जाणार असून त्यासाठी शिमगोत्सवानंतरच खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

पंचायत समिती निवडणूकीत ऐनवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला बाजूला करून शिंदेसेना भाजप युतीने बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिंदेसेनेला ४ तर भाजपला ३ जागांवर समाधान मानावे लागले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला ७ जागा मिळाल्याने आमदार शेखर निकम यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. यातूनच ठाकरेसेनेला बाजूला करत आमदार निकम यांना सत्ता स्थापनेसाठी गळ घालण्यात आली. त्यावर आमदार निकम राजी झाल्याची चर्चा आहे. मात्र सत्ता स्थापनेत सुरवातीची अडीच वर्षे राष्ट्रवादीला सभापती पद देण्याची मागणी आमदार निकमांनी केली. मात्र त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सभापतीपदासाठी सुर्यकांत खेतले यांचे नाव आघाडीवर आहे. तर शिवसेनेकडून विनोद झगडे, संदेश आयरे आणि भाजपकडून विनोद भूरण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. राज्य सरकारकडून सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. मार्च मध्ये सभापती निवडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिमगोत्सवानंतरच सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट, तसेच शिंदेसेना भाजप युतीकडून अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. या तिन्ही राजकीय पक्षांनी केवळ गटनेत्यांची निवड केली असून सत्ता स्थापनेचा निर्णय बाकी ठेवला आहे. सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा निर्णय जाहिर केला जाईल, असे शिंदेसेनेचे उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी सांगितले.