चिपळुणात तब्बल ७ वाहन चालकांवर कारवाई

चिपळूण:- मंगळवार ६ मे रोजी चिपळूण शहर आणि परिसरातील विविध भागांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. सावर्डे बाजारपेठ, बहादूरशेख नाका, अलोरे आणि शिरगाव परिसरात ही कारवाई करण्यात आली. अनेक चालकांनी आपली वाहने रस्त्याच्या मधोमध किंवा रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणी उभी केल्याने ही कारवाई करण्यात आली.

सावर्डे बाजारपेठ येथे सानिका फुटवेअर समोर सुनील सोमा कुंभार (वय ४५) याने त्याची एमएच.०८ एमआर.५३२२ क्रमांकाची मॅक्स गाडी रस्त्यावर उभी करून ये-जा करणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण केला होता. याप्रकरणी सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बहादूरशेख नाका परिसरात मिळालेल्या माहितीनुसार, निलेश मारुती पड्‌याळ (वय ३१) याने चिपळूण-कराड रोडवर प्रवेश तोड करून शिवराज ढाब्यासमोर त्याची गाडी रस्त्यात उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. याच परिसरात गणेश बाब कदम (वय ४२) यानेही त्याची गाडी कोकण सुपर मार्केटसमोर रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभी करून धोका निर्माण केला होता. या दोन्ही घटनांबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, बहादूरशेख नाका येथे सकाळी ११.१५ वाजता झालेल्या एका अपघातात शेर सिंग कल्याण सिंग खेरय्या (रा. मध्यप्रदेश) या ट्रक चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून दत्ताराम गणपत वाघे यांच्या ह्युंदाई आय टेन गाडीला धडक दिली. या धडकेत वाघे यांच्या गाडीचे आणि बाजूने जाणाऱ्या नगरपरिषदेच्या डंपरचेही नुकसान झाले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलोरे-शिरगाव परिसरातही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. शिरगाव नाका येथे शंकर बाबुराव जाधव (वय ४८) याने त्याची टाटा मॅजिक गाडी (एमएच ०८ झेड ५४०१) रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. तर अलोरे बाजारपेठ समोर मंगेश रविंद्र जाधव (वय ४०) याने त्याची टाटा मॅजिक गाडी (एमएच ०८ ए एन ६८४७) आणि खडपोली फाटा येथे हिदायत महंमद शेख (वय ४०) याने त्याची टाटा मॅजिक गाडी (एमएच ०८ आर ४७२८) रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभी केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.