भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
चिपळूण:- चिपळूणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टोईंग व्हॅनने चौघांना चिरडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास रायगड मधील वीर रेल्वे स्थानकासमोर घडली. या भीषण अपघातात चौघांनाही जीव गमवावा लागला. अपघातग्रस्त टोईंग व्हॅन चिपळूणमधील असून मद्यधुंद अवस्थेतील टोईंग व्हॅनच्या मालकाला स्थानिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, युनिक ब्रेकडाऊन या टोईंग व्हॅनचा मालक सुयोग सहस्त्रबुद्धे (राहणार पाग, चिपळूण) मुंबई च्या दिशेने निघाला होता. दरम्यान ही गाडी वीर रेल्वे स्टेशनसमोर येताच सुयोगचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणी त्याने रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या चौघांना जोरदार धडक दिली. यात दोघे जागीच गतप्राण झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघात घडताच लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु वाटेतच त्यांचा जीव गेला. लोकांनी सुयोग याला भरपूर चोप दिला. आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. तर सुयोगचा साथीदाराने अपघातानंतर पळ काढला.
मृत पावलेले चौघे हे गाडीतले डीझल संपल्याने गाडीबाहेर थांबले होते. तर त्यांचा एक साथीदार डिझेल आणण्यासाठी गेला होता. त्याची प्रतीक्षा करीत असतानाच मृत्युने या चौघांनाही गाठले. त्याशिवाय टोइंग व्हॅनवरील सूयोगने भरपूर मद्यप्राशन केले होते, अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.