रत्नागिरी:- तालुक्यातील चिंचखरी येथील 76 शेतकर्यांनी एकत्र येऊन केलेल्या गटशेतीचे मॉडेल संपूर्ण कोकणात राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रकारे शेतकरी प्रयोग करत आहेत, ही माहिती जिल्हाप्रशासनाला नाही. शेतकरी- प्रशासनातील संवाद निर्माण करण्याची गरज आहे, असा विरोधी पक्षनेेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानपरिषद विरोधी पक्षनेते भाजचे आमदार प्रवीण दरेकर यांनी कोकण दौर्यावर आहेत. रत्नगिरी तालुक्यातील पोमेंडी, चिंचखरी येथील शेतकर्यांशी त्यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शेतकर्यांच्या परिस्थितीची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, कोकणात भात, नाचणी यावरच सर्वकाही अवलंबून असते. ते पिक नष्ट झाले की सर्वच वाया गेल्या सारखे आहे. चिंचखरी येथे शेतीची पाहणी केली. या गावातील 76 शेतकर्यांनी एकत्र येऊन सामुदायिक भातशेती केली आहे. याबाबत अधिकार्यांना विचारले असता हा प्रयोग त्यांना माहिती नव्हता. केंद्र व राज्य सरकार गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देत आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, खानदेशात याचा शेतकर्याला उपयोग होत आहे. त्यातून शेतकर्याचे उत्पन्न वाढत आहे. दुर्देवाने रत्नागिरीत अशा प्रयोगशील शेतकर्यांना प्रशासनाकडूनच मार्गदर्शन मिळालेले नाही. प्रशासन आणि शेतकरी यांच्यात सवांदाची दरी निर्माण झालेली आहे.
गटशेतीला प्राधान्य देण्यासाठी जिल्हाप्रशासनाने अभियान सुरु करावे अशा सुचना जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत. चिंचखरी हे गटशेतीचे यशस्वी मॉडेल तयार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. शासनाचे अनुदान शेतकर्यांना मिळावे यासाठी आमदार प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत एक बैठक येत्या काही दिवसात घेण्यात येणार आहे. हे अभियान संर्पूण कोकणात राबवण्यात येणार असून गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपकडून पावले उचलली जातील असे दरेकर यांनी सांगितले.