‘ग्रीन क्लायमेट’ फंडाचे साह्य; खाडी किनारी पर्यटनाला चालना
रत्नागिरी:- किनारपट्टी भागातील 11 तालुक्यात कांदळवन, प्रवाळ संवर्धनाबरोबरच परिसंस्थांवर आधारित उपजिविकेलाही प्रोत्साहन देण्यासाठी ‘ग्रीन क्लायमेट’ फंडाच्या सहाय्याने प्रकल्प राबविण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात येणार्या उपक्रमामुळे किनारी भागातील चार तालुक्यात पर्यटनाला चालना मिळणार आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत कांदळवन संवर्धन, उपजिवीका प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. यामध्ये राज्यातील 4 किनारी जिल्ह्यातील 11 तालुक्यात प्रकल्प राबवला जाणार आहे. देवगड, मालवण, वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), रत्नागिरी, दापोली, गुहागर, राजापूर (रत्नागिरी), श्रीवर्धन व अलिबाग (रायगड) आणि पालघर, डहाणू यांचा समावेश आहे. युनायटेड नेशन्स डेव्हल्पमेंट प्रकल्प, ग्रीन क्लायमेट फंड यांच्या आंशिक अर्थ सहाय्यातून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व ओडीसा या तीन राज्यात इनहांसिंग क्लायमॅट रेसिलियन्स ऑफ इंडियाज कोस्टल कम्युनिटीज हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
कांदळवन विभागामार्फत कांदळवन संरक्षण आणि उपजिवीकेसाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामध्ये या नवीन प्रकल्पाची भर पडली आहे. यामध्ये किनारी भागातील निसर्ग पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. त्याचबरोबर किनारपट्टी भागातील गावांमध्ये महिला बचत गट स्थापन करुन त्यांना उपजीवीकेसंदर्भात प्रशिक्षण दिले जाईल. त्यात कालवे पालन, सेंद्रीय पध्दतीने एसआरटी पध्दतीने भात लागवड, निसर्ग पर्यटन याचा समावेश असेल. त्याचबरोबर किनार्यावरील मोकळ्या जागांमध्ये कांदळवनाची लागवड केली जाणार आहे. निसर्ग पर्यटनात खाडींची स्वच्छता आणि गटामार्फत रोजगार निर्मिती करता येऊ शकेल.
या पध्दतीचा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आला होता. रत्नागिरीत प्रथमच याची अंमलबजावणी होत आहे. या प्रकल्पामुळे कांदळवन, प्रवाळ परिसंस्थांसह अवनत पाणलोट क्षेत्राचे पुन: स्थापन व 3 वर्ष देखभाल करता येणार आहे. कांदळवनातील खेकडेपालन, शिंपले शेती, कालवं शेती, खेकडा उबवणूक केंद्र, शोभिवंत मासेपालन, सी विड फार्मिंग, भातशेतीकरीता तंत्र, मासे मूल्यवर्धित उत्पादने, मत्स्य खाद्य उत्पादन घटक, मासे धुरळणी केंद्र, मध उत्पादन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.









