चारसो पार वाल्यांना तडीपार करण्याची वेळ: भास्कर जाधव

रत्नागिरी:- मागील दहा वर्ष मतदार संघासाठी खा. विनायक राऊत कार्यरत असून लोकांच्या सुखदु:खात उभे रहात आहेत. त्यामुळे आपल्या माणसाच्या पाठिशी उभे राहताना 400 पार वाल्यांना आता तडीपार करण्याची वेळ आली असल्याचे आवाहन शिवसेना उबाठाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टिका केली. आजची निवडणूक ही भाजपा विरुध्द नागरिक अशी असल्याचे सांगत, लोकशाही टिकवण्याची व हुकुमशाही मिटवण्याची जबाबदारी आता नागरिकांची आहे. सामाजिक भेदभाव मिटवण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना सर्व काही समजत असल्याने आता मशाल पेटवण्याची ही वेळ असल्याचे आ. भास्कर जाधव म्हणाले. आताच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील याबद्दल शंका कुणाच्याही मनात नसल्याचे सांगतानाच. सध्या ‘ओरिजनल बीजेपी’ आहे कुठे असा प्रश्न उपस्थित केला. विविध आरोप, घोटाळ्यांनी बरबटलेल्यांनाच भाजपाने पक्षात प्रवेश दिला असल्याने आता भेकड लोकांना उत्तर देण्याची गरज नसल्याचेही आ. जाधव यांनी सांगितले. मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली. त्यातील एकही पुरे झाले नाही, 15 लाखांचे आश्वासनही हवेत विरुन गेले आहे. त्यामुळे आता त्यांना तडीपार नव्हे तर हद्दपार करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरीतील माळनाक येथील मराठा समाज हॉलमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना उबाठासह राष्ट्रवादी, काँग्रेस, आप व महाविकास आघाडीचे मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात शिवसेना उबाठाचे सचिव वरुण सरदेसाई, आमदार राजन साळवी, वैभव नाईक, सिंधुदूर्गमधून माजी आमदार प्रवीण भोसले, माजी आमदार हुस्नबानू खलिपे, माजी आमदार सुभाष बने, रमेश कीर, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आ. राजन साळवी यांनीही मार्गदर्शन करताना खा. विनायक राऊतांसारखा साधासरळ नेता, ज्याला भेटण्यासाठी सर्वसामान्यांना कुणाचीही मदत लागत नाही असे सांगितले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनीही विनायक राऊत यांना रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक मते मिळतील असा विश्वास व्यक्त केला.


मागील 39 वर्षाच्या कारकिर्दीत राजकारणात नारायण राणेंचे या भागात साम्राज्य होते. मात्र विकासात्मक असे त्यांनी काय केले. राज्यात गडचिरोली हा संवेदशील जिल्हा होता, त्याच्या बरोबरीने रत्नागिरी-सिंधुदूर्गला संवेदनशील मतदान केंद्र असलेला जिल्हा बनवल्याची टिका खासदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली. मागील दहा वर्षात आपण कोकण संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न करीत असून आता एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याचे त्यांनी सांगिलते. आतापर्यंत आपण 107 खळा बैठका घेतल्या असून, महिन्यातील 20 दिवस जनतेसाठी देत असतो तर दिवसातील 14 तास उपलब्ध असल्याचेही खा. राऊत यांनी सांगितले.