काजळीतील गाळ उपसा कासवगतीने
रत्नागिरी:-काजळी नदीतील चांदेराई ते हरचिरी दरम्यान सुरु असलेला गाळ उपसा कासवगतीने सुरु आहे. अशातच मागील आठ-दहा दिवस गाळ उपशाचे काम बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी गाळ उपसा होऊन इथला प्रश्न निकाली लागेल का असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. अवघ्या एका मशिनने हे काम सुरु असून, काढलेला गाळ किनार्यावरच ठेवला जात असल्याने तो पुन्हा नदी पात्रात येण्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली.
चिपळूण, खेडप्रमाणे दरवर्षी रत्नागिरीतील चांदेराई, हरचिरी या भागाला काजळी नदीला येणार्या पुराचा तडाखा बसत असतो. येथील बाजारपेठ छोटी असल्याने याकडे प्रशासनाचे अनेक वर्ष दुर्लक्ष झाले आहे. यंदा येथील पुराच्या प्रश्नाकडे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लक्ष देत काजळी नदीतील गाळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी नियोजनमधून निधीही मंजूर झाला. एप्रिलच्या शेवटच्या पंधरवड्यात या कामाला सुरुवातही झाली. मात्र काही दिवस काम सुरु झाले. पाटबंधारे विभागाकडून एक पोकलेन मशिनने काम सुरु करण्यात आले होते.
चांदेराई ते हरचिरी हा सुमारे एक किलोमीटरच्या नदीपात्रातील गाळ मोकळा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. चांदेराईपासून या कामाला सुरुवात झाली. सुमारे शंभर मीटरपर्यंत नदीपात्रातील गाळ बाजूला करण्यात आला आहे. मात्र हा गाळ नदीकिनार्यावरच टाकण्यात आला आहे. त्यातही मागील आठ ते दहा दिवसापासून हे काम बंद पडले होते. ते शुक्रवारी पुन्हा सुरु करण्यात आले. एकाच मशिनने काम सुरु असल्याने गाळ काढण्याचा वेग कमी आहे. गाळ घेऊन जाण्याबाबत ग्रामस्थांमधून कोणीही पुढे येताना दिसले नाही.
पावसाळ्यापर्यंत हे काम सुरु राहणार असून, या नदीपात्रात गाळाची मोठ्याप्रमाणात बेटे तयार झाली असून ती काढून पाण्याचा मार्ग मोकळा केला जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान कामाचा वेग वाढवण्यासाठी आणखी मशिनरींची आवश्यकता आहे. चिपळूणप्रमाणेच याठिकाणी प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांनी मांडले. या कामाकडेही प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने लक्ष द्यावे अशी भावनाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.