चांदेराई बाजारपेठेत आढळलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेतील पिकअप शेडमध्ये पडलेल्या अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २० मे २०२५ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला. विष्णू संभाजी सोलीम (55, हरचेरी ओशी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद अर्जुन सोलीम यांनी मयत विष्णू सोलीम हे चांदेराई बाजारपेठेतील पिकअप शेडमध्ये पडलेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर खबर देणारे आणि त्यांचे नातेवाईक यांनी तातडीने विष्णू सोलीम यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना २० मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केले.