चांदेराईवासियांची पुरापासून कायमस्वरूपी मुक्तता; गाळ काढण्याचे काम ७० टक्के पूर्ण

रत्नागिरी:- दरवर्षी पावसाळ्यात काजळी नदीच्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठेतील दुकानदारांसह अनेक नागरिकांचे नुकसान होत होते. नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत ६०० मीटर लांब आणि सात फूट खोल खोदाई पूर्ण झाली आहे. अजून 30 टक्के काम शिल्लक आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यात चांदेराईवासियांची पुरापासून कायमस्वरूपी मुक्तता होणार आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी गतवर्षी गाळ काढण्यासाठी जिल्हा नियोजनमधून २५ लाख रुपये तर पाटबंधारे विभागाकडून मशिनरी उपलब्ध करून दिली होती. गतवर्षी पावसाळ्यापूर्वी शंभर मीटर अंतरावरील गाळ काढण्यात आला होता. एक मशिन आणि एक डंपर असल्यामुळे जास्त गाळ काढता आला नव्हता; मात्र यंदा पाऊस गेल्यानंतर डिसेंबर महिन्यातच पाटबंधारे विभागाकडून गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू झाले. गेले 3 महिने दोन पोकलेन, एक लोडरसह नदीपात्रातील गाळ काढला जात आहे. पात्रातील गाळ नदीच्या किनार्‍यावर आणून टाकण्यासाठी 3 डंपर दिवसभर काम करत आहेत. चांदेराई पुलापासून हरचिरी धरणाच्या भिंतीपर्यंत सुमारे 900 मीटर परिसरातील गाळ काढला जाईल. आतापर्यंत सहाशे मीटर अंतरातील गाळ काढला आहे. सात फुटापेक्षा अधिक खोल खोदाई केली असून काजळी नदीचे पात्र गेले अनेक वर्षांपासून गाळाने भरलेले होते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुरामुळे नुकसान होत होते. हरचिरीमार्गे लांजा रस्ता वाहतुकीलाही बंद पडायचा. मे महिन्यापर्यंत नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू राहिले तर भरपूर काम पूर्ण होईल. त्यामुळे पुढील पावसाळ्यात चांदेराई बाजारपेठेतील व्यावसायिकांसह आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांची पुरापासून मुक्तता होणार आहे.