चंपक मैदानात बेशुद्धावस्थेत सापडली तरुणी; अंगावर आढळल्या जखमा

रत्नागिरी:- शहराजवळ असणाऱ्या चंपक मैदानात बेशुद्धावस्थेत एक तरुणी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर तरुणीला पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या तरुणीच्या अंगावर जखमा आढळल्या असून याबाबत पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या घटना सतत वाढत असल्याने सध्या याच विषयावर सर्वत्र चर्चा सुरू असते. अलीकडेच घडलेल्या बदलापूरच्या घटनेमुळे लोकांमध्ये या विषयाबाबत प्रचंड संतापाचे वातावरण आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी चंपक मैदानावर एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. तिच्या अंगावर ओरखडे असल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तेथे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत तातडीने तपास सुरू केला आहे.