घरडा कंपनीतील आगीचे कारण आले समोर

खेड:- लोटे येथील घरडा केमिकल कंपनीतील प्लांट 7 मधील रिऍक्‍टर चार्जिंग केल्यानंतर प्रेशर टेस्ट करून प्लांट बंद केला; परंतु रसायनाचे सुक्ष्म तुषार हवेत असताना विद्युत वाहक तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि आग लागून पुढील दुर्घटना घडली, असे घरडा केमिकलचे व्यवस्थापन रामकृष्ण कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेतील गंभीर जखमी अभिजित सुरेश तावडे यांची प्रकृती स्थिर आहे. 

या घटनेचा तपास करण्यासाठी कंपनीच्या स्थानिक व मुंबई येथील सुरक्षा व तांत्रिक तसेच उत्पादन अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या पुढे अशी दुर्घटना टाळण्यासाठी कंपनी व्यवस्थापन सक्रिय झाले असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. शनिवारी (20) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल कंपनीच्या प्लांट क्र. 7 मध्ये रिऍक्‍टर चार्जिंग केल्यानंतर प्रेशर टेस्ट करून तो बंद केला. परंतु रसायनाचे सुक्ष्म तुषार हवेत असताना विद्युत वाहक तारांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून आगीचा भडका उडाला. त्यामध्ये घटनास्थळी उपस्थित असणारे पाचजण भाजले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. 

जखमी अभिजित सुरेश तावडे याच्यावर प्राथमिक उपचार करून तात्काळ मुंबई येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल ऐरोली मुंबई येथे हलवण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, घरडा कंपनीत दररोज 4 हजार कर्मचारी काम करतात. 20 मार्चला घडलेला अपघात ही एक दुर्दैवी घटना होती. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना कंपनीने तत्काळ 55 लाख प्रत्येकी देण्याचे जाहीर केले आहे.