मिलिंद कीर; १५ दिवसांत निर्णय न घेतल्यास मोर्चा
रत्नागिरी:- काही दिवसांपासून साळवी स्टॉप येथील कचऱ्याच्या डंपिंग ग्राउंडमधून येणारा धूर आणि वासामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. घनकचरा प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पालिकेच्या बाजूने लागूनही प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न कायम आहे. एमआयडीसीत प्रकल्प करायचा म्हणून पालकमंत्र्यांच्या अट्टाहासामुळे तो रखडला आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केला आहे. येत्या १५ दिवसात याबाबत पालिका प्रशासनाने निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नीलेश भोसले उपस्थित होते. कीर म्हणाले, रत्नागिरीचे प्रवेशद्वार असलेल्या साळवीस्टॉप परिसरात पुन्हा एकदा धूर आणि वासामुळे नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. अनेक वर्ष हा त्रास नागरिक सहन करत आहेत. स्टेट बँक कॉलनी, शिवाजीनगर, नाचणे, साळवीस्टॉप, जे. के. फाईल्स परिसरातील नागरिक साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडमुळे त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेचा घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी २००५ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी दांडेआडोम येथे जागा दिली; मात्र स्थानिक ग्रामस्थांनी याला विरोध केल्याने तत्कालीन महसूलमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती. २०११ मध्ये ही स्थगिती उठवण्यात आली. प्रकल्पाकडे जाणारा रस्ता मिळावा म्हणून आपण नगराध्यक्ष झाल्यावर प्रयत्न केले. त्यानंतर ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतली. अगदी सर्वोच्च न्यायालयात हा निकाल रत्नागिरी पालिकेच्या बाजूने लागला. त्यानंतर या जागेभोवती लाखो रुपये खर्च करून उंच संरक्षण भिंतही बांधण्यात आली.
कचरा प्रकल्पासाठी केंद्राकडून सात ते साडेसात कोटीचा निधीही प्राप्त झाला. यासाठी डीपीआर बनवण्यात आला. निविदाही निघाली होती; परंतु ठाकरे सरकारच्या कालावधीत स्थानिक आमदार मंत्री असलेले उदय सामंत यांनी एमआयडीसीत प्रकल्प करू, असे सांगत दांडेआडोम येथील प्रकल्प थांबवला. आज ते स्वत: उद्योगमंत्री असतानाही अद्याप प्रकल्पासाठी जागा देऊ शकलेले नाहीत. एमआयडीसीत जागेचा थांगपत्ता नसतानाही घनकचरा प्रकल्पासाठी वेळ का काढला जातोय, असा प्रश्नही मिलिंद कीर यांनी उपस्थित केला.









