घटस्फोटापर्यंत आलेल्या पाच महिलांचे संसार ‘सखी’ने पुन्हा फुलवले

रत्नागिरी:- पती-पत्नीच्या तात्विक वादात घटस्फोट हा पर्याय नसून टोकाची भूमिका घेऊन घटस्फोटापर्यंत आलेल्या पाच महिलांचे संसार ‘सखी’ने पुन्हा फुलवले आहेत. दारु पिऊन नवर्‍याचा त्रास आणि अनैतिक संबंधांचा संशय यावरुनच संसार तुटण्याच्या मार्गावर असलेली सर्वाधिक प्रकरणे दाखल होत आहेत. सखी वनस्टॉपच्या या उपक्रमाचा जिल्ह्यातील अनेक पीडित महिलांना फायदा झाला आहे. घटस्फोटापर्यंत आलेली अजुन 35 प्रकरणे प्रलंबित आहेत.

कौटुंबिक हिंसाचारासह लैंगिक शोषण, बालविवाह, हुंडाबळी, छळ, जाच, ऍसिड हल्ले, सायबर क्राईम आणि बाललैंगिक शोषण याविरोधात केंद्र शासनाने महिला व बालविकास विभागामाफत देशभरात सुमारे 700 च्या आसपास सखी वनस्टॉप सेंटर सुरू केली आहेत. त्यातील एक सेंटर रत्नागिरीत असून जिल्ह्याचा संपूर्ण कारभार या सेंटरमधून सुरू आहे. एखाद्या पीडितेला न्याय मिळत नसेल अथवा ती महिला असह्य असेल, पोलीस स्थानकात तिची तक्रार नोंद होत नसेल त्याचबरोबर अत्याचारग्रस्त गरजू महिला व मुलींना मोफत वैद्यकीय सेवा तसेच न्यायालयात पीडितेची बाजू मांडण्याकरिता मोफत वकील आणि अत्याचारग्रस्त गरजू महिला व 18 वर्षाखालील मुलींना 5 दिवसांची तात्पुरती मोफत निवार्‍याची व्यवस्था या सखी वनस्टॉप सेंटरच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.

रत्नागिरीत 15 फेब्रुवारी 2021 रोजी सखी वनस्टॉप सेंटर सुरू झाले आणि आतापर्यंत 134 प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यातील 108 प्रकरणे ही कौटुंबिक हिंसाचाराची होती तर 8 प्रकरणे बाल लैंगिक अत्याचार, हुंडा 1, घटस्फोटसाठी 3 प्रकरणे दाखल झाली होती. त्यातील 5 प्रकरणे समुपदेशन करून निकाली काढण्यात आली. या सेंटरचा मुख्य उद्देश आहे पीडित महिला व मुलींना सहाय्य करणे यासाठी 14 जणांची टीम या सखी वनस्टॉपच्या माध्यमातून कार्यरत आहे. अवघ्या 10 महिन्यात या सेंटरच्या माध्यमातून अनेक पीडितांना न्याय मिळाला आहे तर पाच महिलांचे तुटत आलेले संसार याच सखी’च्या माध्यमातून पुन्हा जुळून आल्याने महिलांकरिता हे सेंटर महत्वपूर्ण ठरले आहे.
या सेंटरच्या केंद्र प्रशासक म्हणून अश्‍विनी मोरे-पाटील या काम पाहत असून कानूनी सहाय्यतेसाठी ऍड. नंदा चौगुले पोलीस ठाण्यात पीडितेला मदत करण्यासाठी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील तर केस वर्कर म्हणून अंकिता चौगुले, पॅरामेडिकलसाठी प्रेरणा सुर्वे, सुप्रिया शितप या काम पाहत असून त्या केंद्रात समुपदेशक म्हणून स्वरा मयेकर, माहिती व तंत्रज्ञान यासाठी प्राची रसाळ, दिपाली भुस्कुटे या काम पाहत आहेत.

दरम्यान, रत्नागिरीतील एका शासकीय कार्यालयातील महिला कर्मचार्‍याने वरीष्ठांचा त्रास होत असल्याची तक्रार सखी कार्यालयाकडे केली आहे. ते प्रकरण पुढील चौकशीसाठी विशाखा समितीकडे पाठविण्यात आले आहे.