कार्यकर्त्यांचा आपलाच उमेदवार विजयी होण्याचा दावा
रत्नागिरी:- तालुक्यातील ग्रामीण भागात पारावर, कट्ट्यावर सध्या लोकसभा निवडणुकीच्या गप्पा रंगत असल्याने गाव‚खेड्यातील राजकारण तापू लागले आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने राजकीय अंदाज मांडत आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपला पक्ष कसा प्रबळ आहे, हे पटवून देत आहे. उन्हाच्या तडाख्यात निवडणुकीची चर्चा मात्र गरम होताना दिसत आहे.
सध्या गावगाड्यातील वातावरण निवडणूकमय बनले आहे. लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा लोक महोत्सव. या महोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते. त्या अनुषंगाने आता सर्वत्र गप्पागोष्टी रंगत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीनिमित्त अनेक मुद्यांचा ऊहापोह होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उद्योगधंदे, शिक्षण, पाणीप्रश्र, वीजप्रश्न, शेतमालाचे हमीभाव, बरोजगारी आदी मुद्यांचा यात समावेश आहे. आतापर्यंत झालेला विकास कोणता व सर्वसामान्यांना नेमके काय हवे, याबाबत गावोगावी चर्चा रंगू लागल्याचे दिसते. सर्वच पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. कोणत्या पक्षाचा उमेदवार पराभूत होणार व कोण जिंकणार, याबाबत खमंग चर्चा रंगत आहेत. कोण जिंकतो, कोण हरतो, याचा निवाडा निवडणूक निकालानंतर होणार आहे. चर्चा मात्र आतापासूनच सुरू झाल्या आहेत. निवडून कोणी का येईना, चर्चा मात्र झडत आहेत.
ग्रामीण भागातील लोकांत लोकसभा निवडणुकीत उत्साह कमी दिसत असला, तरी तरुण वर्गात चर्चा मात्र जोरात आहे. जाणकार मंडळी लोकसभा निवडणुकीत चर्चा करीत असले, तरी विधानसभा निवडणुकीची गणिते मांडत आहेत.