ग्रामीण, कृषी- सहकार मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन

चिपळूण:- कोकणातील नमन, संकासूर, लेझीम पथक, पारंपारिक वेशभूषा, वारकरी व भक्तीमय देखावे साकारत चाललेली ग्रंथदिंडी पालवण पंचक्रोशीत दुमदुमली. जिवंत देखावे व लोककलेतून भारतीय सस्कृतीचे दर्शन देखील यानिमीत्ताने घडले. साहित्यीक, कृषी व सहकार क्षेत्रातील अनेकांनी या ग्रंथदिंडीत सहभाग घेत मोठ्या उत्साहात पालवण येथील ग्रामीण, कृषी, सहकार मराठी साहित्य संमेलन २०२६ चा शुक्रवारी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

राज्यात प्रथमच कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था आयोजित ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी ग्रंथदिंडीने रंगत आली. संमेलन अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे ध्वजारोहण ज्येष्ठ साहित्यीक प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आमदार शेखर निकम यांनी पालखीचे पूजन केले. यानंतर पालवण चौकातून ग्रंथदिडीला सुरवात झाली. या ग्रंथदिडीत तालुक्यातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह स्थानिक नमन मंडळ व पारंपारिक लोककलेतील कलाकार मंडळी देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

सती चिंचघरी हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या लेझीम पथकाने या ग्रंथदिडीत जोश निर्माण केला. याशिवाय आंबतखोल विद्यालयाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनावर आधारीत समुहनृत्य सादर करत अनेकांचे लक्ष वेधले. राष्ट्रपुरूषांच्या व्यक्तीरेखा देखील यानिमीत्ताने रेखाटण्यात आल्या. याशिवाय वारकरी व विठ्ठल रूक्मीणीचे जिवंत देखावे देखील साकारण्यात आले होते. राज्यातील विविध भागातील लोककला आणि संस्कृती, याशिवाय देशातील विविध राज्यातील वेशभूषा, तेथील लोककला, शेती व्यवस्था याबाबतचे दर्शन घडवण्यात आले. या दिंडीतून निसर्ग वाचवा चा संदेशही देण्यात आला. पालवण चौकातून ढोल ताशाच्या वाजत गाजत काढलेल्या या ग्रंथदिडींत हजारो विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.

संमेलनस्थळी ग्रामिण, कृषी, सहकार संबंधीत पुस्तकांचे स्टॉल्स लवण्यात आले आहेत. सायंकाळी झालेल्या कवी संमेलनात कोकणसह राज्यातील कवींनी एकाहून एक सरस कविता सादर केल्या. विविध विषयावर कविता सादर झाल्या. रसीकांनी त्यास तितकीच दाद दिली.

यावेळी प्रमुख कार्यवाह डॉ. निखील चोरगे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण, वंसत सावंत, ज्येष्ठ कवी अरूण इंगवले, राष्ट्रपाल सावंत, धिरज वाटेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रभूनाथ उर्फ बाबा देवळेकर आदि उपस्थित होते.

शनिवारी १४ रोजी सकाळी १० वाजता पहिल्या ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, स्वागताध्यक्ष डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, प्रमुख पाहुणे म्हणून गृह राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, किरण सामंत, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे व मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.