ग्रामसेवक क्रिकेट स्पर्धेत चिपळूण, संगमेश्वरला विजेतेपद

लांजा तालुका महिला संघाला उपविजेतेप

चिपळूण:- रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील ग्रामसेवकाच्या पुरुष व महिला गटाच्या क्रिकेट स्पर्धा तालुक्यातील अडरे येथील मैदानावर झाल्या. पुरुष गटात चिपळूण तालुक्याने संगमेश्वर संघावर मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, तर महिला ग्रामसेवक गटात संगमेश्वर तालुक्याने लांजा तालुक्याचा पराभव करत विजेतेपद पटकावले. दोन्ही विजेत्या संघांना पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

ग्रामसेवकांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा, खेळातून ताणतणाव कमी व्हावा या हेतूने स्पर्धेचे आयोजन केले होते. पुरुष गटात पहिली उपांत्यफेरीचा सामना चिपळूण व रत्नागिरी तालुक्यात झाला. या गटात जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये चिपळूण तालुक्याने विजय संपादन करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तर दुसरा उपांत्यचा सामना संगमेश्वर व खेड तालुक्यात झाला. यामध्ये संगमेश्वर संघाने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. स्पर्धेतील अंतिम सामना चिपळूण- संगमेश्वरमध्ये झाला. चिपळूण तालुक्याने प्रथम फलंदाजी करताना ५ ओव्हरमध्ये ५९ धावांचे आव्हान संगमेश्वर तालुक्यास दिले. धावसंख्येचा पाठलाग करताना संगमेश्वर तालुक्याची दमछाक झाली. संगमेश्वरचा संघ ३३ धावांमध्ये गारद झाला. खेड तालुक्यास तृतीय क्रमांक मिळाला.

महिला गटात ६ तालुक्यांचे संघ सहभागी झाले होते. महिलांमधील अंतिम सामना संगमेश्वर विरुद्ध लांजा तालुक्यात झाला. संगमेश्वरमधील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विजेतपदाला गवसणी घातली. संघटना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के यांनीही हजेरी लावून ग्रामसेवकांना प्रोत्साहन दिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी चिपळूण तालुका सरपंच संघटना अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारिणीतील सदस्य व सर्व सभासदांनी मेहनत घेतली.