ग्रामविकास विभाग; पारदर्शकतेसाठी निर्णय
रत्नागिरी:- ग्रामपंचायतीची मासिक सभा व ग्रामसभा गावच्या विकासासाठी आणि लोकसहभागाची चळवळ वाढीस महत्वाच्या आहेत. अधिनियमात तरतुद असतानाही नियमानुसार सभांचे कामकाज होत नाही. यावर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामसभा, मासिक सभांचे चित्रीकरण करण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाकडून देण्यात आले आहेत.
ग्रामसभेला लोक येत नाहीत, महत्वाच्या व वादाच्या विषयावर चर्चा होत नाहीत, केवळ वादाचे विषय सभेत होतात, नियमाप्रमाणे सभांचे कामकाज होत नाही, काही ठराव ग्रामसभेत चर्चा न होता परस्पर पाठविले जातात, अशा लोकांच्या तक्रारी आहेत. ग्रामसभांना ठराविकच लोक उपस्थिती लावतात. ग्रामपंचायत सभांना महिला सदस्या केवळ सह्यासाठी उपस्थित असतात, अशाही तक्रारी आहेत. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून ग्रामसभा व ग्रामपंचायतीची मासिक सभा नियमानुसार पार पाडण्याबाबत पंचायत समिती व ग्रामपंचायतींना लेखी सूचना केल्या जातात. तरीही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. ग्रामसभेत विकासकामांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. महत्वपूर्ण ठराव, शासकीय योजनांची अंमलबजावणी, योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड, ग्रामपंचायतींना मिळालेला निधी, विकासकामांवर झालेला खर्च, शिल्लक याची माहिती ग्रामसभेत लोकांना मिळत असते. ग्रामसभा व मासिक सभांचे कामकाज प्रभावी व नियमानुसार न करणार्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. वॉर्ड सभा, महिला सभा, ग्रामपंचायत सभा, ग्रामसभा यांचे कामकाज अधिक पारदर्शक व्हावे यासाठी शासन पातळीवरून प्रयत्न होताना दिसतात, पण ते गाव पातळीवर होत नाहीत. ग्रामसभा, मासिक सभांचे चित्रीकरण आवश्यक ग्रामपंचायतीचे कामकाज पारदर्शक असले पाहिजे. त्यामुळे सभा सरू असताना त्याचे चित्रीकरण करणे आवश्यक आहे. अधिनियमांच्या अधिन राहून ग्रामपंचायतींचे कामकाज चालत असल्याने चित्रीकरणास सदस्यांचा आक्षेप असण्याचे कारण नाही. निवडून दिलेला सदस्य सभेत कसा बोलतो, चर्चेत सहभागी होतो का,विषयांचा अभ्यास आहे का, याची माहिती चित्रीकरणाच्या माध्यमातून जनतेला होईल. प्रत्येक सभेचे चित्रीकरण करून ते ग्रामपंचायतीत जतन करून ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.