ग्रामसंघ, प्रभाग संघातील महिलांना लवकरच अँड्रॉईड मोबाईल: ना. सामंत

रत्नागिरी:- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्यवृध्दीसाठी प्रयत्न करणार्‍या ग्रामसंघ, प्रभाग संघातील महिलांना समाधानकारक वेतन देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपूरावा केला जाईल. ग्रामसंघ, प्रभाग संघाच्या बैठकांसाठी जिल्हा नियोजनमधून प्रत्येकी दोन लाख रु. देण्यात येतील, त्यासाठी १ कोटी १० लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील १८०० महिलांना अँड्रॉईड मोबाईल देण्याची घोषणा उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी केली.

सोमवारी रत्नागिरीच्या दौर्‍यावर असलेल्या ना.सामंत यांनी अल्पबचत सभागृहात राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत काम करणार्‍या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिलांनी आपल्या मागण्या ना.सामंत यांच्या समोर मांडल्या.
राज्यातील ७१ लाख गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी अभियान राबविले जात आहे. या करीता समुदाय संघटन, गरिबांच्या गरीबांनी निर्माण केलेल्या बळकट समुदायस्तरीय संस्थांची निर्मिती, विविध पथदर्शी प्रकल्प, स्वयंसेवी व शासकीय तसेच खाजगी संस्थासोबत भागीदारी अद्यावत मनुष्यबळ संसाधन विकास पद्धती, शाश्वात उपजीविकेचे स्तोत्र उभे करण्याकरिता अभियानामार्फत तसेच विविध वित्तय संस्था व बँकांच्या माध्यमातून वेळेवर, किफायत व्याज दराने व नियमित वित्त पुरवठा, कृतीसंगमांच्या माध्यमातून विविध शासकिय योजनांचा गरीब कुटुंबांना लाभ मिळविण्याकरिता समुदायस्तरीय संस्थांची क्षमता बांधणी करणे, अशा अनेक नाविन्यपूर्ण व परिणामकारण पद्धतीने अभियानाची अंमलबजावणी आम्ही प्रयत्न करत आहोत.
अभियानाअंतर्गत मिळणारे मानधन अत्यंत कमी असून त्यातील निम्मे पैसे प्रवासासाठी खर्च होतात. त्यामुळे आम्हाला मानधन वाढवून द्या हि प्रमुख मागणी करण्यात आली.यावर ना.सामंत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन राज्यातील महिलांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तर खेळत्या भांडवलात वाढ करुन ते १५ हजारांवरुन ३० हजार करण्यात आले आहे. प्रभाग संघाला बैठका घेण्यासाठी प्रत्येकी २ लाखांचा निधी दिला जाईल. त्यातून उत्तम काम करणार्या बचत गटांसाठी तीन परितोषिके देण्यात यावीत. तर इतर गटांच्या माहिलांना प्रवास खर्च त्यातून करण्यात यावा अशी सुचना ना.सामंत यांनी केली.

योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महिलांना मोबाईलाचा वापर करावा लागतो. काहि माहिला मुले, पती यांच्या मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे जिल्ह्यातील १८०० महिलांना जिल्हा नियोजनमधून मोबाईल देण्याची घोषणा ना.सामंत यांनी केली. दोन महिन्यात प्रत्येक महिलेकडे मोबाईल असेल असेही त्यांनी सांगितले.