ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र आज होणार स्पष्ट

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज अंतिम दिवस; जिल्ह्यात 22 उमेदवारांचे अर्ज बाद

रत्नागिरी:- जिल्ह्यात होणार्‍या 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी केलेल्या अर्जांची छाननी झाल्यावर एकूण सरपंचपदाचे सहा अर्ज बाद ठरले असून सदस्यपदाचे 16 असे 22 अर्ज अवैध ठरले आहेत. वैध ठरलेल्या अर्जांपैकी नामनिर्देक्षणपत्र मागे घेण्यासाठी बुधवारी शेवटची मुदत असून, त्यानंतर निवडणुकीला खर्‍या अर्थाने रंगत येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या 222 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 18 डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देक्षणपत्र भरणार्‍या उमेदवारांच्या अर्जांची सोमवारी छाननी झाली. यामध्ये सरपंचपदासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांपैकी चिपळूण व संगमेश्वरमध्ये प्रत्येकी दोन तर रत्नागिरी व लांजामध्ये प्रत्येकी एक अर्ज बाद ठरला. तर सदस्यपदाचे जिल्ह्यात 16अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये दापोली 1, चिपळूण 2, रत्नागिरी 7 तर राजापूरमध्ये 6 अर्ज बाद ठरले आहेत.
मंडणगड सरपंचपदासाठी 44 तर सदस्यपदासाठी 193, दापोलीत सरपंचपदासाठी 85 तर सदस्यासाठी 305, खेडमध्ये सरपंचासाठी 34 तर सदस्यासाठी 124, चिपळूणमध्ये सरपंच 68 तर सदस्यासाठी 301, गुहागरात 51 सरपंचपदासाठी तर 252 सदस्यपदासाठी, संगमेश्वरमध्ये सरपंचपदासाठी 113 तर सदस्यासाठी 402, रत्नागिरीत सरपंचपदासाठी 85 तर सदस्यपदासाठी 422, लांजात सरपंचासाठी 54 तर सदस्यासाठी 220 व राजापूरमध्ये सरपंचपदासाठी 103 तर सदस्यपदासाठी 387 अर्ज वैध ठरले आहेत. या उमेदवारी अर्ज करणार्‍यांना बुधवार दि. 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपयर्र्त अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
त्यामुळे ग्रामीण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले किती उमेदवार माघार घेतात, कोणकोणाशी हातमिळवणी करणार याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. काही ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध असताना सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे तर काही ठिकाणी सरपंच, सदस्य बिनविरोध करताना एकाद्या जागेसाठीही निवडणूक होत असल्याने, अशा ग्रामपंचायतींकडेही राजकीय पदाधिकार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.