ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुका बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युती करूनच: प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 

रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, जागा वाटपाचा हा निर्णय केंद्र आणि राज्याचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवते. केंद्रीय नेतृत्व ठरवेल त्यानुसार कोण लढवणार हा निर्णय होणार आहे. मात्र शिंदे-फडणवीस यांच्या शिवसेना-भाजप युतीद्वारेच निवडणुक लढवल्या जातील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले.

रत्नागिरी दौर्‍याप्रसंगी पत्रकरांशी बोलताना ते म्हणाले, सध्याच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अठरा तास काम करुन विकासाचा बॅकलॉग भरुन काढत आहेत. पुढील पाच वर्षाचे नियोजन आखून विकासाचे कार्यक्रम आखत आहेत. जनसंपर्क, जनसंवाद साधत लोकांमध्ये विश्‍वास निर्माण करत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीचा अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, सत्तेकरता सरकार, पैशाकरता सत्ता असा काळ आणि आता दुसरीकडे समर्पित नेत्यांचा काळ असा फरक दिसून येईल. भविष्यात संघटनात्मक योजना आखणी करत आहे. फे्रंडस् ऑफ भाजप ही युवकांना जोडणारी योजना हाती घेतली आहे. गरीबांसाठीच्या योजना तळागाळात पोचवण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत योजनांचा लाभ घेणार्‍या ५ कोटी ६५ लाखापैकी २ कोटी लाभार्थ्यांनी पंतप्रधानांना पोस्ट कार्ड पाठविली आहेत. या माध्यमातून पक्ष संघटन मजबुत करण्यावर भर आहे.

निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले, मागील वेळी ६०८ पैकी ३८५ ग्रामपंचायती राज्यात भापजन जिंकल्या आहेत. यावेळी त्यापेक्षाही अधिक यश मिळवू. ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये शिवसेना-भाजप युतीद्वारे वर्चस्व राखले जाईल. विधासभेमध्ये 200 च्या वर तर लोकसभेत ४५ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळूव असा आमचा विश्‍वास आहे. भाजपला जनतेत समर्थन मिळत आहे. रत्नागिरीत संघटनात्मक भाजप कमी आहे, पण येथेही संघटनेची प्रचंड ताकद उभी करण्यासाठी मी दौरे करणार आहे. भविष्यातील निवडणुकीत रत्नागिरीतील चित्र बदलेले पहायला मिळेल. संघटनात्मक उर्जा येथे निर्माण झालेली दिसेल. रत्नागिरीच्या जनतेला काय देऊ शकू याची पाहणी या दौर्‍यात करुन त्याची अंमलबजावणी भविष्यात केली जाणार आहे. येथील लोकसभेच्या जागेसंदर्भातील निर्णय केंद्रीय नेतृत्व करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उध्दव ठाकरे निष्क्रीय मुख्यमंत्री: बावनकुळे

केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकार गतीशील आहे. यापुर्वीचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अडीच वर्षांपैकी 18 महिने मंत्रालयातच आले नव्हते. ज्यांनी मंत्रालय पाहिले नाही, केवळ फेसबुक लाईव्ह केले, कधी रत्नागिरीतील शेतकर्‍यांच्या बांधावर पाय ठेवला नाही, कॅबिनेटही व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे केल्या. आतापर्यंत मी अनेक मुख्यमंत्री पाहिले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात निष्क्रीय मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचे नाव जोडले जाईल. त्याचे पन्नास पुरावे सादर करु शकेन.