रत्नागिरी:- ग्रामपंचायत स्तरावर विविध योजनांतर्गत बांधकामावरील गुणनियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी कामांची गुणनियंत्रण चाचणी होणार आहे. याबाबत शासनाने जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आदेश काढला आहे.
ग्रामपंचायतस्तरावर केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा परिषद, जिल्हा वार्षिक योजना तसेच ग्रामपंचायतीच्या स्वनिधीमधून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची बांधकामे करण्यात बांधकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होणे अत्यंत आवश्यक असते. बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य देखील गुणवत्तापूर्ण व दर्जेदार तसेच योग्य त्या मानकाप्रमाणे असणे गरजेचे असते.
जिल्हा स्तरावर वेळोवेळी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार काही ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणाऱ्या बांधकामामध्ये अंदाजपत्रकामध्ये गुणनियंत्रण प्रयोगशाळा चाचणीसाठी तरतूद केलेली असतानाही बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणनियंत्रण प्रयोगशाळा चाचणी अहवाल घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील कामांची अंदाजपत्रके तयार करताना त्यामध्ये साहित्यांची गुणनियंत्रण प्रयोगशाळा चाचणी अहवाल घेण्याबाबतची तरतूद करण्यात आली असल्याची खातरजमा करावी. अंदाजपत्रकामध्ये गुणनियंत्रण प्रयोगशाळा चाचणी अहवाल घेण्याची तरतूद केल्याशिवाय तांत्रिक मान्यता देणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याने तांत्रिक मंजुरी प्रदान करू नये. प्रत्येक कामांमध्ये साहित्याचे गुणनियंत्रण प्रयोगशाळा चाचणी अहवाल प्राप्त करुन घेण्याची अंमलबजावणी यंत्रणेवर राहील. जवाबदारी
कामांच्या बिलासोबत गुणनियंत्रण प्रयोगशाळा चाचणी अहवाल असेल तर बिले देण्यात यावीत असेही मुख्य कार्यकारी अधिकान्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे गावोगावी आता दर्जेदार कामे होतील याबाबत दुमत नाही.
‘या’ कामांवर राहणार लक्ष…
ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी इमारत, शाळा इमारत, सामाजिक सभागृहे, सभामंडप, गटर्स, पिण्याच्या पाण्याची टाकी, पाईपलाईन, पेव्हर्स, स्मशानभूमी बांधकाम, व्यायामशाळा इमारत, व्यापारी, बाजार गाळे, अंतर्गत रस्ते, घरकुले अशा प्रकारच्या अनेक कामांची बांधकामे ग्रामपंचायत स्तरावर सातत्याने सुरू असतात. कामाच्या अंदाजपत्रकीय रकमा विचारात घेऊन कामांची अंमलबजावणी एजन्सी म्हणून स्वतः ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येतात. तसेच मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मान्यताप्राप्त ठेकेदार यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.









