रत्नागिरी:- गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत करायची असल्यास शासनाने निकष निर्धारित केले आहेत. मात्र, निकषात बसत असतानाही ग्रामपंचायतींचे विभाजन केले जात नसल्याने शासनाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी गावची लोकसंख्या दोन हजार आवश्यक आहे. आदिवासी अथवा तांडा भागासाठी किंवा दोन गावांमधील अंतर 3 किलोमीटरपेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या एक हजार असणे आवश्यक आहे.
मात्र, या निकषात बसणारी गावे असतानाही ग्रामपंचायतीचे विभाजन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायत विभाजनाची मागणी असलेल्या ग्रामपंचायतींचा आढावा घेऊनप्राप्त झालेले व निकषात बसणारे प्रस्ताव तातडीने विभागीय आयुक्तांमार्फत शासनास सादर करावेत, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. याबाबतची कार्यवाही करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे.