रत्नागिरी:- शहरानजिकच्या मिरजोळे एमआयडीसीत गोवंशाचे शीर आढळणे ही निंदनीय घटना आहे. हे कृत्य करणारा समाजकंटक कोणत्याही जातीधर्माचा असला तरीही त्याच्यावर कडक कारवाई करा, पुन्हा अशी कृत्ये होणार नाहीत याची दक्षता पोलीस दलाने घ्यावी असे आदेश आपण जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. जिल्ह्यातील जनतेने कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे. पोलीस समाजकंटकाला शोधून त्याच्यावर निश्चित कारवाई करतील यासाठी भरारी पथके स्थापन करण्याचे आदेश पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले आहेत. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ना.सामंत यांनी शासनाची भूमिका मांडली.
एमआयडीसीमधील रस्त्यावर गोवंशचे शीर आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण पोलीस अधिक्षक यांच्याशी चर्चा करून कडक कारवाई करण्याचे निर्देश गुरूवारी रात्रीच दिले होते. कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत या मताचे आपण आहोत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा समाज कंटकाचा शोध घेत आहेत. त्याला शोधून काढत पोलीस कडक कारवाई करतील.
रत्नागिरीतील जनतेने संयम बाळगून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. अशा प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढणार नाही याची दक्षता राज्य सरकार निश्चितपणे घेईल. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनीही समाजकंटकावर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. अशा घटनांबाबत ज्या संघटनांकडे ही माहिती आहे त्यांनी ती तात्काळ पोलिसांना द्यावी. पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील. आवश्यकता वाटल्यास त्यांना पोलीस संरक्षण देऊ, असेही ना.सामंत यांनी सांगितले.
गोवंशाचे शीर आढळल्यानंतर पोलिसांनी एमआयडीसी परिसरात शोधाशोध सुरू केल्यानंतर येथील मार्गांवर सीसीटीव्ही नसल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत पत्रकारांनी पालकमंत्री ना.सामंत यांना विचारले असता आजच आपण सीसीटीव्हीची निविदा काढण्याचे आदेश दिले आहेत,असे सांगितले. येत्या काही दिवसात एमआयडीसीतील सर्व रस्ते सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येतील असा विश्वास ना.सामंत यांनी व्यक्त केला.