रत्नागिरी:- गोवंश हत्येप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या शादाब गनी बलबले (रा.क्रांतीनगर) याचा तालुक्यातील वेतोशी येथे स्वतःच्या जागेत गुरांचा गोठा असल्याचे उघड झाले आहे. रविवारी रात्री पोलिसांनी या गोठ्याची तपासणी करून तेथील दहा गुरांची सुटका केली आहे. तर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार शादाब बलबले याच्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शादाबच्या अडचणी अधिकच वाढणार आहेत.
सुमारे पाच दिवसांपूर्वी मिरजोळे एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक 44 समोर मुख्य रस्त्यावर गोवंशाचे शीर आढळून आले होते. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांसह हिंदू समाज, भाजपानेते निलेश राणे आक्रमक झाले होते. गोवंश हत्या करणाऱ्याला 48 तासात अटक करा असा इशारा श्री.राणे यांनी दिला होता. त्या मुदतीत पोलिसांनी आरोपीला अटक न केल्याने रविवारी सकाळी निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू संघटना, नागरिकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढून त्यानंतर जेलनाक्यात तासभर ठिय्या आंदोलन केले होते.
गोवंश हत्याप्रकरणी पोलिसांना शादाब बलबले याला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. तर पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.
रविवारी रात्रीपासूनच पोलीसांनी तपासाची गती वाढवली आहे. रविवारी रात्री ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी आपल्या टिमसह शादाब बलबले याच्या वेतोशी येथील गोठ्याची पाहणी केली. यावेळी गोठ्यात एक गाय, एक म्हैस, आठ बैल अशी एकूण दहा गुरे आढळून आली. त्यांची राहण्याची, पाणी, चाऱ्याची व्यवस्था योग्य पद्धतीने करण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी दहाही गुरांची तेथून सुटका केली.
रात्री उशिरा पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून शादाब गनी बलबले याच्याविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शादाबवर आता एकूण दोन गुन्हे दाखल झाले आहेत. बुधवारपर्यंत शादाब पोलीस कोठडीत राहणार आहे. या कालावधीत त्याचे कारनामे उघड होण्याची शक्यता आहे.