संगमेश्वर:- मुसळधार पावसामुळे गोळवली परिसरात भूस्खलन झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. जानू गंगाराम करंडे, महादेव भागोजी करंडे आणि गणू करंडे यांच्या मालकीच्या डोंगराचा मोठा भाग खचल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या भूस्खलनामुळे ताम्हण कोंड पऱ्याला नदीसारखा प्रवाह निर्माण होऊन धरणाच्या स्वरूपाचे दृश्य निर्माण झाले. परिणामी, गोळवली वाड्यांकडे जाणारा मुख्य कॉजवे पूर्णपणे बंद झाला आहे.
कुंभारखाणी, करजुवे, धामापूर व संगमेश्वर मार्गावरही झाला असून हे रस्ते बंद झाले आहेत. यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या आपत्तीत अमोल लोध यांच्या बागेतील सुमारे ८० सुपारी झाडे जमीनदोस्त झाली असून त्यांची विहीरही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच गावचे तलाठी तांबटकर, ग्रामसेवक जाधव, सरपंच शालिनी पथये, पोलीस पाटील अप्पा पाध्ये व उपसरपंच उदय दुधम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनाकडून नुकसान भरपाईसाठी अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहनया पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना डोंगरकडील भागांपासून दूर राहण्याचे व आवश्यकतेशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.