गोळप नवेदरवाडीत रत्नदुर्गने उभारला झुलता साकव

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील गोळप नवेदरवाडी येथील पर्‍यामधून पावसाळ्यामध्ये दोरीच्या साह्याने पाण्यातून प्रवास करताना एका प्रौढाचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने अखेर रत्नदुर्ग माउंटेनिअर्सच्या माध्यमातून तात्पुरता झुलता साकव बांधण्यात आला आहे.

या गावातील नवेदरवाडी व रोहिदासवाडी यादरम्यान पर्‍या (वहाळ) असल्याने पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. या ठिकाणाहून ये-जा करण्यासाठी साकवाची सोय नाही. या ठिकाणी असलेल्या चार‚पाच घरातील रहिवासी पावसाळ्यामध्ये गरज भासल्यास मुख्य रस्त्यावर येण्यासाठी एका नायलॉन दोरीचा वापर करून प्रवास करतात. दि. २६ जुलैला या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने रत्नागिरी येथे नोकरीनिमित्त ये‚जा करणारे रवींद्र भाटकर रात्रीच्या वेळी काम आटपून घरी येत असताना या दोरीच्या साह्याने पाण्यातून प्रवास करीत होते. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने रवींद्र भाटकर (वय ४८) यांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे येथील साकवाचा आणि या घरातील ग्रामस्थांच्या ये-जा करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

या परिसरातील लोकांना पावसाळ्यामध्ये ये-जा करण्यासाठी तात्पुरती सोय व्हावी यादृष्टीने रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे प्रमुख विरेंद्र वणजू , गौतम बाष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या साथीदारांसह या पर्यावर लाकडाचा तात्पुरता झुलता साकव बांधला आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या साकवाचा उपयोग ग्रामस्थांना होणार आहे.