पावस:- रत्नागिरी ते पावस रस्त्यावर गोळपधार येथे रिक्षा निष्काळजीपणे चालवून अपघात झाला. स्वतःच्या मरणास व प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत झालेल्या रिक्षा चालकाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार राजाराम मोहिते (वय ४७, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे संशयित मृत चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २) दुपारी दीडच्या सुमारास गोळपधार येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदकुमार मोहिते हे रिक्षा (क्र. एमएच-०९ ईएल ५१३०) ही घेऊन रत्नागिरीहून पावसकडे जात होते. रिक्षा निष्काळजीपणे चालविल्यामुळे कच्या मातीच्या साईडपट्टीवर तेथील रस्त्याच्या लोखंडी गार्डला आदळून रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये स्वतः च्या मरणास व दोन प्रवाशांच्या लहानमोठ्या दुखापतीस कारणीभूत झाला. या प्रकरणी पोलिस हवालदार सुदेश शिंदे यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









