‘गुलाबी थंडी’ गायब; हापूसच्या मोहोरावर संकटाचे ढग

रत्नागिरीत थंडीचा जोर ओसरला, बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण

रत्नागिरी:- अवकाळी पावसाच्या तडाख्यातून सावरलेल्या कोकणातील हापूस आंबा बागायतदारांना नुकतीच मिळालेली ‘गुलाबी थंडी’ची अल्पायुषी साथ आता संपुष्टात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर अचानक कमी झाल्याने मोहोरावर पुन्हा एकदा वातावरणातील बदलाचे ढग दाटले आहेत, ज्यामुळे बागायतदार पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.

आंब्याच्या चांगल्या हंगामासाठी सलग २१ दिवस तापमान १४ अंश सेल्सिअस पेक्षा कमी असणे आवश्यक असते, असे कृषितज्ज्ञांचे मत आहे. परंतु, रत्नागिरी परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांत थंडी पूर्णपणे गायब झाली असून, दिवसाच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. थंडी टिकून राहिल्यास मार्चमध्ये हापूस बाजारात दाखल होण्याची शक्यता होती. थंडी गायब झाल्यामुळे मोहोर कुजणे किंवा किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.

या बदललेल्या वातावरणाचा थेट परिणाम झाडांवर नव्याने आलेल्या मोहोरावर होत आहे. मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू असताना थंडी अचानक थांबल्यास, मोहोराची वाढ खुंटते किंवा तो गळून पडू शकतो. यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका वाढला आहे.

ज्या बागायतदारांनी ‘कल्टार’चा वापर केला नाही, त्यांच्या बागांमध्ये नैसर्गिकरीत्या डिसेंबर-जानेवारीमध्ये मोहोर फुटण्याची अपेक्षा होती. मात्र, आता थंडी कमी झाल्यामुळे नैसर्गिकरित्या मोहोर येण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत.

अवकाळी पावसामुळे पहिल्यांदा बागायतदारांना मोठा फटका बसला. त्यानंतर आलेली थंडी ‘दिलासा’ देईल, असे वाटत असतानाच ती पुन्हा गायब झाली. या सततच्या हवामान बदलांमुळे बागायतदारांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. गुलाबी थंडी आणखीन पंधरा दिवस राहिली असती, तर चांगला मोहोर आला असता. पण ही थंडी आता ओसरल्यामुळे मोहोर टिकणार की नाही, याची भीती वाटत आहे. आता हवामान खात्याकडून पुन्हा थंडी कधी वाढते, याकडेच आमचे लक्ष लागले आहे,” अशी प्रतिक्रिया एका चिंताग्रस्त बागायतदाराने व्यक्त केली.