गुरुजी आले अन् कोरोना पॉझिटिव्ह निघाले; पावसमधील अनेक पालकांचा जीव टांगणीला

रत्नागिरी:- पावस येथील एका नामवंत शाळेत हजर झालेले शिक्षक पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. परजिल्ह्यातून आलेल्या शिक्षकाने कोरोना चाचणी न करता शाळेत हजेरी लावली. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांची कोरोनाची चाचणी केली असता चाचणी पॉझिटिव्ह निघाली आणि अनेकांची झोप उडाली.

संबंधित शिक्षक बुधवारी शाळेत हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाची चाचणी न करताच शिक्षक कामावर रुजू झाले आणि चाचणी केली नसल्याची महिती देखील त्यांनी दडवली. शासनाच्या आदेशानुसार शाळेत जाण्यापूर्वी शिक्षकांनी सक्तीची कोरोना तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र या सुचनेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. 
 

शाळेत हजर झालेले शिक्षक शिकवत असताना दुपारी त्यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांची कोरोना  टेस्ट करण्यात आली.आणि आज ते पॉझिटिव्ह आले आहेत. तत्पुर्वी या  माध्यमिक शिक्षकांनी काल पासून शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवायचं काम केलं होतं. आता शिक्षकाच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांची कोरोनाची तपासणी करण्याचे नियोजन स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाकडून सुरू आहे.